21 February 2019

News Flash

नोकरीचे आमिष दाखवून शेकडो तरुणांची फसवणूक

फसवणूक करणारा एनएसयूआयचा माजी पदाधिकारी आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

आरोपी एनएसयूआयचा माजी पदाधिकारी

विविध सरकारी कार्यालयांमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून शेकडो तरुणांना गंडा घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार इमामवाडा पोलीस ठाण्यांतर्गत उघडकीस आला आहे. फसवणूक करणारा एनएसयूआयचा माजी पदाधिकारी आहे.

विलास नारायणराव पेंचलवार रा. एनआयटी कॉम्प्लेक्स, सक्करदरा असे आरोपीचे नाव असून तो आपल्या कुटुंबासह बेपत्ता आहे. सूरज सुरेंद्र कोढे रा. जयसिंग लेआऊट, पंचवटी, काटोल हा २०१२ मध्ये बेरोजगार होता. मैत्रिणीच्या माध्यमातून त्याची आरोपीशी ओळख झाली.

आरोपीचे कार्यालय तेव्हा उंटखाना येथील हनी अर्चना अपार्टमेंटमध्ये होते. त्यावेळी विलासने सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, समाजकल्याण, रेल्वेमध्ये टीसी, वेकोलि आदी संस्थांमध्ये सरकारी नोकरी लावून देण्याचे अनेकांना आमिष दाखवले. नरसाळा मार्गावरील सर्वश्री विद्यालयाच्या आयटीआयमध्ये लिपिक पदासाठी १३ लाख रुपये लागतील. त्यापैकी ५ लाख रुपये आगाऊ जमा करण्यास सांगितले. त्यानंतर आपण त्याला पाच लाख रुपये दिले. पैसे घेतल्यानंतर आठ दिवसांमध्ये नियुक्तीपत्र देण्यात येईल असे त्याने सांगितले. मात्र, त्यानंतर अनेक वर्षे उलटूनही नियुक्तीपत्र दिले नाही. आपल्यासह अनेकांची त्याने अशाचप्रकारे फसवणूक केली. आपण त्याला पैसे परत करण्याची विनंती केली असता तो टाळाटाळ करू लागला. त्यामुळे २५ मार्च २०१५ त्याच्याविरोधात इमामवाडा पोलीस ठाण्यांतर्गत तक्रार दिली. त्यानंतर अनेक तरुणांनी वेगवेगळ्या तक्रारी दिल्या. तेव्हापासून अद्यापही कोणतीच कारवाई करण्यात आली नाही, असा आरोप कोढे याने केला आहे.

विदर्भातीलही बेरोजगारांचा समावेश

या प्रकरणात आतापर्यंत अनेक तरुणांनी पोलिसांत तक्रार दिली. यात प्रामुख्याने आरोपीने नागपूर व वर्धा येथील २०, यवतमाळ जिल्ह्य़ातील १५, चंद्रपूर जिल्ह्य़ातील ५६ आणि नांदेडच्या तक्रारदारांचा समावेश आहे. तरुणांमधील बेरोजगारीचा फायदा घेऊन त्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी विनंती पीडित विद्यार्थ्यांनी केली आहे.

या प्रकरणातील आरोपी अनेक दिवसांपासून बेपत्ता आहे. त्याचे कुटुंबीयही कुठे सापडत नसून प्रकरणाचा तपास सुरू आहे. लवकरच प्रकरणात गुन्हा दाखल होईल.

– रमाकांत दुर्गे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, इमामवाडा.

First Published on February 7, 2018 3:12 am

Web Title: umemployed youth cheated on name of government job