आंदोलनकर्त्यां विनाअनुदानित शाळा शिक्षकांचे मत

शिक्षक गेल्या १८ वर्षांपासून एक रुपयाही पगार न घेता काम करीत आहेत, हे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना माहीत आहे. कारण ते विरोधी पक्षात असताना त्यांनी आमच्या आंदोलनाला दोन वेळा भेट दिली होती. एवढेच नव्हे तर विधान परिषदेत त्यांनी हा विषय देखील मांडला होता. ‘आमचे सरकार येऊ द्या, तुमचा प्रश्न निकाली काढू’ असे तेव्हा ते बोलत असत. आज तावडे शिक्षण मंत्री आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते आश्वासनापलीकडे काहीही करीत नाहीत. मंत्री झालेल्या तावडेंपेक्षा विरोधी पक्षातील तावडे अधिक बरे होते, असे पटवर्धन मदानावर धरणे देणाऱ्या महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांचे म्हणणे आहे.

महाराष्ट्र राज्यामध्ये कायम विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांचा ‘कायम’ शब्द काढून त्यांना अनुदान त्वरित देऊ, असे शासनाने जाहीर केले होते. सन २०१४-१५ साठी लागणारा नियत व्यय स्वतंत्ररित्या उपलब्ध करून द्यावा, सासंबंधी फेब्रुवारी २०१४ मध्ये शासन निर्णय झाला. त्याप्रमाणे शाळा-महाविद्यालयांची यादीही तयार करण्यात आली. मात्र, तीन वर्षांपासून सरकार यादी जाहीर करत नसल्याने वेतन मिळत नाही. सरकारकडून केवळ टाळाटाळ सुरू आहे.  राज्यातील जवळपास २३ हजार शिक्षकांना याचा नाहक फटका सहन करावा लागत आहे. उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, विभाग तुकडय़ा, वर्ग यांची अनुदानपात्र यादी तयार असून ती सरकारकडून जाहीर करण्यात येत नाही. त्यासंबंधी अनुदानाची शंभर टक्के आíथक तरतूद व तात्काळ पगार सुरू करावा, यासाठी राज्यातील सर्व शिक्षकांनी आतापर्यंत २०४ वेळा आंदोलने केली. यामध्ये १८ वर्षे वाया गेली.

शिक्षकांची आíथक स्थिती खूप बिकट झाली आहे. त्यामुळे शासनाने इतर राज्याप्रमाणे सर्व उच्च माध्यमिक शाळांची अनुदान पात्र यादी, त्याची शंभर टक्के आíथक तरतूद करून जाहीर करावी व सर्व शिक्षकांचा पगार तात्काळ सुरू करावा. आम्ही सरकारच्या फसव्या आश्वासनाचे बळी पडणार नाही. प्रश्न मिटेपर्यंत आम्ही नागपूर सोडणार नाही, असे आंदोलनात सहभागी शिक्षक संतोष वाघ म्हणाले.

जुल महिन्यात मुंबईला झालेल्या पावसाळी अधिवेशानत आम्ही तावडे यांची भेट घेतली होती. तेव्हा देखील त्यांनी तुमच्या मागण्या पूर्ण करतो, असे आश्वासन दिले होते. आज त्याला पाच महिने उलटूनही त्यांनी दखल घेतली नाही. विनोद तावडे आमदार असताना आमच्यासाठी लढा देत होते. त्यांच्याकडून पाठबळ मिळत असल्याने आम्हाला दिलासा व धीर मिळत होता. मात्र, आज आमच्या मागे कुणी नसल्याने तावडे हे विरोधी पक्षातच बरे होते, असे आंदोलक शिक्षक म्हणाले.

रात्रीपर्यंत ठिय्या

१६ वर्षांपासून विना वेतन काम करणाऱ्या शिक्षकांच्या हक्कासाठी सरकारच्या विरोधात संघर्ष करत असताना विना अनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने संघटनेचे कार्याध्यक्ष रामचंद्र बावीस्कर यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी काढण्यात आलेला मोर्चा रात्रभर ठिय्या मांडून बसला होता. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर मोर्चेक ऱ्याचे समाधान न झाल्याने बुधवारी २०० ते २५० शिक्षकही रात्री उशिरापर्यंत ठिय्या मांडून बसले होते. मात्र सरकारने दखल घेतली नसल्यामुळे सायंकाळी शिक्षकही सरकारच्या विरोधात आक्रमक झाले होते.