राखी चव्हाण

भांडेवाडी परिसरातील १५ वस्त्यांचा प्रश्न

पर्यावरणाचे निकष जेव्हा प्रशासनाकडून पाळले जात नाहीत, तेव्हा त्याचा मोठा फटका नागरिकांना बसतो. शहरातील भांडेवाडी परिसर याचे जिवंत उदाहरण आहे. परिसरातील सुमारे १५ वस्त्या धूर आणि दुर्गंधीने त्रस्त आहेत.

४५० एकरवरील भांडेवाडी परिसरातील कचराघराची कचरा साठवण्याची मर्यादा संपुष्टात आली आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातही आता कचऱ्याचे ढिगारे उभे राहात आहे. वाढत्या लोकसंख्येनंतर हा परिसर देखील कचऱ्याने व्यापला जाईल, तेव्हा काय? या प्रश्नाचे उत्तर अजूनही महापालिकेला सापडलेले नाही. उमरेड आणि कळमेश्वर परिसरात कचराघर हलवण्याचे ठरले, पण अद्यापही ते शक्य  झाले नाही. भांडेवाडी परिसरातील सर्वच वस्त्या धुराने त्रस्त झाल्या आहेत. ढिगाऱ्याखाली आग धुमसत असते आणि उन्हाळ्यात त्याचा भडका उडतो.

वाठोडय़ासह साईबाबानगर, सूरजनगर, चांदमारीनगर, पवनशक्तीनगर, सावननगर, साहिलनगर, अंतुजीनगर, मेहरनगर या एक किलोमीटर परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. सडलेल्या कचऱ्यातील गाळ झिरपून भूजल दूषित झाले.

विहिरीतील पाणी दूषित झाले. त्यामुळे त्वचा आणि पोटाचे विकार नागरिकांना झाले. कचराघराला वारंवार लागणाऱ्या आगीमुळे महिलांनी आंदोलन सुद्धा केले होते. मात्र, परिस्थिती कायम आहे. तेथून निघणाऱ्या  डायऑक्सिन्स, फ्युरेन्स वायूमुळे कर्करोग तर नायट्रोजन मोनोक्साईड, सल्फर ऑक्साईड, हायड्रोकार्बन यासारख्या वायूंमुळे दमा, डोळ्यांचा आजार, त्वचारोग होतो.

फेब्रुवारी २०१९ मध्ये कनक रिसोर्सेस मॅनेजमेंटसोबत महापालिकेने कचरा उचलण्यासंबंधीचा केलेला करार संपत आहे. बचतगटांना हे काम देण्याचा विचार सुरू आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषानुसार या कचराघराला ५०० मीटरचा बफरझोन असावा लागतो, पण हे निकष पाळले जात नाही. त्याचा फटका परिसरातील नागरिकांना बसला आहे.

पर्यावरणासाठी काम करणारी देशातील सर्वात मोठी संस्था नीरीने महापालिकेला यासंदर्भात अहवाल दिला होता. दरवर्षी या परिसरातील माती, पाणी आणि वायूचे परीक्षण व्हायला हवे, असेही नीरीने सुचवले होते.

मात्र, त्यानंतरही त्यावर काहीच उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. नीरीच्या अहवालाचे गांभीर्य महापालिकेला उरले नाही.

औरंगाबादसारखीच परिस्थिती

औरंगाबादसारखीच परिस्थिती भांडेवाडीत देखील आहे. औरंगाबाद शहरात नारेगावमध्ये कचराघर आहे. याठिकाणी कचरा टाकण्याला नागरिकांनी विरोध केल्यावर महापालिकेने दुसऱ्या ठिकाणी कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. तेथेही विरोध झाला.  महापालिकेने जबरदस्तीने  कचरा वाहून नेण्याचा प्रयत्न केला तेव्हा नागरिकांनी दगडफेक केली आणि आंदोलन तीव्र झाले. येत्या काही दिवसात उपराजधानीत देखील अशीच परिस्थिती उद्भवणार आहे.

लग्नाच्या आधी श्वसनासंबंधित कोणताही आजार नव्हता. पण आता श्वसन आजाराने हैराण केले आहे. थोडेही काम केल्यानंतर थकवा जाणवतो. धूर आणि दुर्गंधीचा सामना आम्हाला करावा लागतो.

– अर्चना गौरखेडे, सूरजनगर

कचऱ्याचा हवेशी संबंध आल्यानंतर त्यातून उडणाऱ्या धूलिकणातून श्वसनाचे आजार होतात. भांडेवाडीसारखे कचराघर असेल तर तेथून निघणाऱ्या धुरामुळे फुफ्फुसांचे आजार आणि मग हृदयविकाराची देखील शक्यता असते.

– डॉ. सुशांत मेश्राम, श्वसनरोग तज्ज्ञ

नागरिकांच्या आरोग्याची काळजी आम्ही घेत आहोत. कचराघराच्या परिसरात भूखंड खरेदी करू नका, असे आवाहन  केले होते. परंतु स्वस्त भूखंड मिळतात म्हणून त्यांनी २०० मीटर परिसरात घरे बांधली.

– बंटी कुकडे, नगरसेवक, वाठोडा