बडनेरात वीज पडून एकाचा मृत्यू

विदर्भावर अवकाळी पावसाचा मारा सलग तिसऱ्या दिवशीही सुरू असून वादळ व गारपिटीसह झालेल्या पावसाने अनेक गावांमध्ये मोठे नुकसान झाले. वादळासह आलेल्या पावसामुळे जिवित आणि वित्त हानीला सध्या सामोरे जावे लागत आहे. बुधवारी नागपूर जिल्ह्य़ातील दोन गावांमध्ये वीज पडून दोघांचा मृत्यू झाला, तर गुरुवारला अमरावती जिल्ह्य़ातील बडनेरात वीज पडून एकाचा मृत्यू झाला.

अमरावती शहर व परिसरात  दुपारच्या सुमारास अर्धा ते पाऊण तास जोरदार वादळी पाऊस झाला. पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. बडनेरात वीज पडून एकाचा जागीच मृत्यू झाला. यवतमाळ जिल्ह्य़ात वादळी पावसाचा परिणाम आठवडी बाजारावर झाला तर आजही आर्णी तालुक्यातील पडशी, जलाद्री, पालोदी, आयता आदी सात-आठ गावांमध्ये जोरदार वादळी पाऊस झाल्याने या गावांमधील अनेक घरांचे छप्परे उडाली.

प्राणहानी झाली नसली तरी गावकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अकोला, बुलढाणा जिल्ह्यातील काही भागातही वादळी पाऊस झाला. वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी अत्यल्प प्रमाणात गारपीटही झाली.

चंद्रपूर जिल्ह्यातही गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी ढगाळ वातावरण होते. सायंकाळी वादळ सुटल्याने ताडोबातील मोहोर्लीच्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या ६ रिसॉर्टवरील छते उडाल्याने सुमारे २५ लाखांचे नुकसान झाले. गोदियातही वादळ होते. वर्धा शहरातसुद्धा सायंकाळपासून मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या. नागपपरात दुपापर्यंत उन्हं होते, पण नंतर आकाश काळवंडून आले आणि पुन्हा पावसाने थमान घातले. नागपूर परिसरातील कळमेश्वर, सावनेर, मोहपा, धापेवाडा या ग्रामीण भागातही सुमारे तासभर मुसळधार पाऊस कोसळला. सतत तीनही दिवस ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात अवकाळी पावसाने विदर्भात थमान घातल्यामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला.

मालेगाव, जळगावमध्ये गारपीट

नाशिक : काही दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, भुसावळ, धुळ्यासह अनेक ठिकाणी पाऱ्याने चाळीशी ओलांडली असताना गुरूवारी नाशिक, जळगाव आणि धुळे जिल्ह्य़ांत पावसाने हजेरी लावली. मालेगाव, अमळनेर व पारोळा तालुक्यात काही ठिकाणी गारपीट झाल्याने आंबा उत्पादक धास्तावले आहेत.गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मालेगाव तालुक्यातील झोडगे, दाभाडी परिसरात पावसास सुरूवात झाली. दाभाडी भागात काही प्रमाणात गारपीटही झाली. जळगाव, अमळनेर व पारोळा तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता. अमळनेर तालुक्यात विजेचे खांब वाकल्याने अनेक गावांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला. पारोळा तालुक्यातील ढोली येथे पाच घरांची पत्रे उडाली. धुळे शहरासह ग्रामीण भागात दुपारी तीनच्या सुमारास सुमारे दीड तास पाऊस झाला.