आठ महिन्यांपासून हालचाली शून्य

नागपूर : थायलंडमध्ये हत्तीला कृत्रिम पाय बसवण्याचा प्रयोग यशस्वी झाला म्हणून गोरेवाडा बचाव केंद्रातील पायाची बोटे गमावलेल्या ‘साहेबराव’ या वाघाला देखील कृत्रिम पाय बसवण्याचे प्रयत्न सुरू  झाले होते. मात्र, मागील आठ महिन्यांपासून या दिशेने काहीही हालचाली होत नसल्याने हा प्रयोग दिवास्वप्न तर ठरणार नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, हा प्रयोग यशस्वी झाला असता तर तो देशातील पहिला  प्रयोग ठरला असता.

शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकल्यामुळे ‘साहेबराव’च्या पायाची बोटे कापावी लागली. महाराजबाग प्राणिसंग्रहालयात असलेल्या या वाघाला नंतर गोरेवाडा बचाव केंद्रात स्थलांतरित करण्यात आले. वन्यप्राणी दत्तक योजनेअंतर्गत ‘साहेबराव’ला डॉ. सुश्रूत बाभूळकर यांनी दत्तक घेतले. थायलंडमध्ये त्यांच्या एका मित्राने पायात समस्या असणाऱ्या हत्तीला दत्तक घेतले होते.

त्याला कृत्रिम पाय बसवून चालण्याइतपत सक्षम केले. तोच प्रयोग डॉ. बाभूळकर यांनी या वाघाबाबत करण्याचे ठरवले. मित्राशी चर्चा करून गोरेवाडा प्रशासनाला त्यांनी यासंदर्भात सांगितले. त्यानंतर ऑगस्ट २०१८ मध्ये वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्र तसेच महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाची चमू, सुश्रूत रुग्णालयाची चमू यांनी ‘साहेबराव’ ची क्ष-किरण तपासणी व इतर वैद्यकीय तपासणी केली. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गौतम भोजने यांनी त्याला बेशुद्ध केले. डॉ. विनोद धूत व डॉ. शिरीष उपाध्ये यांनी त्यावर लक्ष ठवले. डॉ. सुश्रूत बाभूळकर यांनी त्याची क्ष-किरण तपासणी केली. या तपासणीचा अहवाल आल्यानंतर दुसरे पाऊल उचलण्यात येणार आहे. या सर्व प्रक्रियेत वनविकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. एन. रामबाबू व गोरेवाडय़ाचे अधिकारी आणि कर्मचारीही उपस्थित होते. वाघाच्या बाबतीत होणारा हा प्रयोग तसा कठीणच होता. त्यामुळेच त्याने कृत्रिम पाय स्वीकारला नाही तरी त्याला चालताना होणारा त्रास नाहीसा करणे, हे आमचे ध्येय असहे. त्याचे दु:ख कमी होऊन तो व्यवस्थित चालू शकेल, असे डॉ. सुश्रूत बाभूळकर त्यावेळी म्हणाले होते. मात्र, गेल्या आठ महिन्यात यासंदर्भात काहीही पावले उचलली गेली नाहीत. यासंदर्भात डॉ. सुश्रूत बाभूळकर यांना विचारले असता आम्ही परवानगीची वाट पाहात असल्याचे त्यांनी सांगितले. जर या प्रयोगाला परवानगीच नव्हती तर पहिली तपासणी कशी काय केली, असाही प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. त्यामुळे भारतातला हा पहिला प्रयोग प्रयोगच तर राहणार नाही ना, अशीही चर्चा आता सुरू झाली आहे.