स्थानिक वृत्तपत्रांमध्ये जाहिरातीतून विमान वाहतूक कंपन्यांमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून बरोजगारांची फसवणूक होत असल्याचे उघडकीस आले आहे. काही युवक त्यांच्याकडील नियुक्तीपत्रे घेऊन नागपूर विमातळावर गेल्यावर ही नियुक्तीपत्रेच बनावट असल्याचे निदर्शनास आले आहे. हजारो रुपये खर्चून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येऊनही हे युवक पोलिसात तक्रार करत नसल्याने बेरोजगार युवकांना फसवण्याचे प्रकार सर्रास सुरूच आहेत.
नागपुरातील मराठी आणि इंग्रजी वृत्तपत्रांमधील छोटय़ा जाहिरातींमधून विमान कंपन्यांमध्ये तिकीट चेकिंग स्टाफ, ग्राऊंड डय़ुटी स्टाफसह विविध पदांसाठी नियुक्ती देण्याचा दावा केला जातो. मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर विमानतळावर अशा नोकरीची संधी आहे. त्यासाठी दूरध्वनीवरून संपर्क साधा किंवा एसएमएस करावा, असेही त्यात म्हटलेले असते. या जाहिरातींमध्ये पद आणि वेतनासंबंधी माहिती असते. या पदांसाठी अर्जाच्या चौकशीसाठी दूरध्वनी क्रमांक दिलेला असतो. त्यावर संपर्क साधल्यानंतर नोंदणी शुल्क ५०० ते २००० रुपये जमा करण्यासाठी बँक खाते क्रमांक दिले जाते. हे नोंदणी शुल्क बँकेत भरल्यानंतर संबंधितांची माहिती दूरध्वनीवरून मागितली जाते. तेव्हाही प्रक्रिया शुल्क म्हणून पाच ते दहा हजार रुपये बँक खात्यात जमा करण्यास सांगण्यात येते. त्यानंतर कागदपत्रांच्या सत्यप्रती मागवल्या जातात. संबंधित उमेदवाराची प्रथम दूरध्वनीवरून मुलाखत घेतली जाते. यादरम्यान पुन्हा एकदा काही हजार रुपये जमा करण्याची सूचना केली जाते. पुढील टप्प्यात नियुक्तीपत्र देण्यात येते खरे, परंतु ते देण्यासाठी आणखी १० ते २० हजार रुपयांची मागणी केली जाते. अशाप्रकारे टप्प्याटप्प्याने ४० ते ५० हजार रुपये उमेदवाराकडून वसूल केले जातात. त्यानंतर त्याला नियुक्तपत्र पाठवून नागपूर विमानतळावर जाण्याची सूचना केली जाते. उमेदवार विमानतळावर नियुक्तीसाठी जातो तेव्हा त्याला कळते की, त्याच्याजवळचे नियुक्तीपत्रच बनावट आहे. एवढा आर्थिक भरूदड आणि मानसिक त्रास सहन करूनही हे उमेदवार पोलीस तक्रार करत नसल्यामुळे बेरोजगार युवकांना फसवण्याचे प्रकार बिनदिक्कत सुरूच आहेत.
काही दिवसांपूर्वी असाच प्रकार उघडकीस आल्यावर आर्थिक गुन्हे शाखेने संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्याचे जाबजबाब नोंदवून घेतले होते. त्यानंतर काही दिवस या गोष्टींना आळा बसला होता. पुन्हा गेल्या ८ ते १० महिन्यांपासून हे प्रकार वाढीस लागले आहेत. वर्धेच्या एका युवकाला सुपरव्हायझर (ग्राऊंड स्टाफ) या पदासाठीचे इंडिगो कंपनीचे नियुक्तीपत्र देण्यात आले. उमेदवाराला मिळालेल्या नियुक्तीपत्रावर २८ मे २०१६ ही तारीख आहे. उमेदवाराला ६ जून २०१६ पासून नियुक्ती देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. सहा महिन्यांचा प्रोबेशन कालावधी आहे. या कालावधीत काम समाधानकारक असल्याचे दिसून आल्यास नियमित करण्यात येईल. मूळ वेतन १९ हजार २०० रुपये आणि इतर भत्ते वेगळे देण्यात येतील, असे त्या नियुक्तीपत्रात नमूद आहे. या पत्रावर इंडिगो एअरलाईन्सचे एचआर मॅनेजर म्हणून अभिजित सिंग यांची स्वाक्षरी आहे. मात्र, इंडिगो कंपनीने नागपुरात कर्मचारी भरतीची जाहिरात दिलेली नाही. कंपनीत कुठल्याही प्रकारची भरती प्रक्रिया सुरू नाही. वर्धेच्या एका युवकाला मिळालेले नियुक्तीपत्र बनावट असल्याचे इंडिगो कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.