28 May 2020

News Flash

बेरोजगारीचा मुद्दा महत्त्वाचाच, मतदान करताना विचार करणार

रोजगार देऊ शकणारा किंवा त्यासाठी प्रयत्न करणारा पक्ष किंवा उमेदवार यांना प्राधान्य देऊ, अशा प्रतिक्रिया महाविद्यालयीन तरुण-तरुणींनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केल्या.

निवडणुकीतील आश्वासनांवर महाविद्यालयीन तरुणाईच्या प्रतिक्रिया

बेरोजगारीचा प्रश्न महत्त्वाचा आहेच. उच्चशिक्षण  घेऊनही रोजगार नाही, त्यामुळे निराशा आली आहे. मतदान करताना या गोष्टींचा नक्कीच विचार केला जाईल, रोजगार देऊ शकणारा किंवा त्यासाठी प्रयत्न करणारा पक्ष किंवा उमेदवार यांना प्राधान्य देऊ, अशा प्रतिक्रिया महाविद्यालयीन तरुण-तरुणींनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केल्या.

राज्य विधानसभेसाठी येत्या सोमवारी मतदान होणार असून यात तरुण मतदारांचा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे. महाविद्यालयीन तरुणांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या बोलण्यातून बेरोजगारीचा मुद्दा त्यांच्यासाठी महत्त्वाचा असल्याचे दिसून आले. काहींनी शिक्षणाच्या विद्यमान पद्धतीवर नाराजी व्यक्त केली, तर काहींनी शिक्षणातील आरक्षणामुळे गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होतो असे मत मांडले. राजकीय पक्ष  आणि उमेदवारांवरही नाराजी व्यक्त केली. या सर्व बाबींचा विचार आम्ही यावेळी मतदान करताना करू, असा त्यांच्या बोलण्यातील सूर होता.

काश्मीरचा मुद्दा येथे काय कामाचा?

सत्ताधारी किंवा विरोधक सामान्यांच्या प्रश्नांविषयी गंभीर नाही. आज तरुणांपुढे बेरोजगारीचा प्रश्न आहे. तो सोडवण्यासाठी पावले उचलली जात नाही. केवळ पोकळ आश्वासने दिली जातात. महाराष्ट्रातील निवडणुकीत आपले मुख्यमंत्री काश्मीरच्या प्रश्नावर बोलतात हे वाईट आहे. – प्रणय चौधरी, एम.ए. नागपूर विद्यापीठ,

रोजगाराचा मुद्दा महत्त्वाचाच

शहरात मिहान प्रकल्प असून युवकांना रोजगार नाही. विद्यापीठात रोजगारभिमुख शिक्षण दिले जात नाही. त्यामुळे युवकांनी नेता निवडताना या बाबींचा गांभीर्याने विचार करावा.– आकाश हेडाऊ, विद्यापीठ परिसर.

शिक्षणात आरक्षण नको

शिक्षणातील आरक्षण बंद व्हायला हवे. यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होतो. सर्वाना समान अधिकार हवा, शिक्षणातील आरक्षणामुळे अनेकांवर अन्याय होतो. यावर विचार करणारे सरकार हवे. – ट्विंकल ठुठेजा,  मानसशास्त्र विभाग.

रोजगार निर्मितीकडे दुर्लक्ष

रोजगारीचा  प्रश्न गंभीर आहे, मात्र सरकार काहीही करत नाही. केवळ  खूप काही करीत असल्याचे चित्र माध्यमांतून रंगवले जात आहे. देशाची आर्थिक स्थिती रोज खालवत असून त्याचा परिणाम रोजगारनिर्मितीवर होत आहे. – दृष्टी चुग, मानसशास्त्र विभाग.

विचाराअंती मतदान करू

मतदान करताना उमेदवार शिक्षित आहे का, त्याला सामान्यांच्या प्रश्नांची जाण आहे का, या बाबी तपासून मतदान करेल. – योगिता जाधव, एलएडी कॉलेज.

मतदानातूनच परिवर्तन शक्य

खोटी आश्वासने देऊन मतदारांची फसवणूक टाळण्यासाठी व योग्य उमेदवार निवडून यावा म्हणून मतदान आवश्यक आहे. मतदानातूनच परिवर्तन शक्य आहे. – प्रियांका गायकवाड,  विद्यापीठ परिसर.

‘वोट फॉर चेंज’

‘वोट फॉर चेंज’ म्हणत नागपूरच्या भवितव्याची सुरुवात माझ्या मतापासून करणार आहे. जात, पात, धर्म याचा विचार न करता बदलासाठी मतदान करणार आहे. – रणजीत गर्ग,  जी.एस. कॉलेज.

रोजगार देणाऱ्याला मत

माझे मतदान हे तरुणाईचे हात बळकट करणाऱ्याला आणि आम्हाला रोजगार देऊ शकणाऱ्या सरकारलाच असणार आहे.– शुभांगी जोशी, एलएडी महाविद्यालय.

विकासाच्या केवळ गप्पा

नागपुरात उद्योग नाही, रोजगार नाही. रस्त्यावर खड्डे आहे की  खड्डय़ात  रस्ते आहेत, हे कळत नाही.  बेरोजगारी कायम आहे. केवळ विकासाच्या बाता केल्या जात आहेत. यावेळी मूलभूत प्रश्न सोडवणाऱ्यालाच मत देणार. – केतन येवले, जी.एस. कॉलेज.

नोकरी देणारे सरकार हवे

विद्यमान शैक्षणिक व्यवस्थेत बदल व्हायला हवा. नोकरी देताना तुमची गुणपत्रिका नाही तर गुणवत्ता तपासायला हवी. एका वर्गामध्ये कुणाला किती गुण मिळाले, यावरून आपण त्याचा बुद्धय़ांक ठरवू शकणार नाही. त्यामुळे गुणवत्तेचा आधार मानून नोकरी देणारे सरकार हवे. – रागा गुप्ता,  मानसशास्त्र विभाग.

गुन्हेगारी वाढली

राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाले आहे. शहरात गुन्हेगारी इतकी वाढली, एकटी महिला शहरात नऊ नंतर फिरू शकत नाही. याला जबाबदार कोण? – रितिका गाडे,  बी. एस्सी., एलएडी कॉलेज.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2019 1:03 am

Web Title: unemployment election voting akp 94
Next Stories
1 नवोदय बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला अटक
2 कुख्यात आंबेकरविरुद्ध दुसरा गुन्हा दाखल
3 शहरातील मोठय़ा तेल व्यापाऱ्यांवर धाड
Just Now!
X