करोना रोखण्यासाठी अनेक आस्थापने, कारखाने आणि कंपन्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. ऑनलाईन सेवा देणाऱ्या कंपन्यांचेही काम बंद आहे. त्यांनी कर्मचाऱ्यांना वेतनाची हमी दिलेली नसल्याने हजारो कर्मचारी चिंतित आहेत.

करोनामुळे इतर व्यवसायामुळे ई-कॉमर्स बिझनेसला देखील मोठा फटका बसला आहे. कारण, अत्यावश्यक नसलेल्या वस्तूंचा पुरवठा करण्यावर बंदी आली आहे. मात्र सरकारने ई-कॉमर्स किंवा ऑनलाईन बिझनेस करणाऱ्या कंपन्यांनी सुटीच्या काळात कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन द्यावे. आणि शक्य असल्यास त्यांना घरून काम करायण्यास सांगावे किंवा सुटीवर पाठवावे,  असे सुचवले आहे. मात्र, ऑनलाइन कंपनी अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट कंपन्यांनी सरकारचे आदेश पाळल्याचे दिसून येत नाही.

या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वेतनाची कोणतीही हमी न देता घरी बसण्यास सांगितले आहे. त्यामुळे डिलव्हरी बॉयच्याआर्थिक अडचणीत वाढ होणार आहे. नागपुरात सुमारे एक हजारहून अधिक डिलव्हरी बॉय आहेत. त्यांना कंपन्यांनी किंवा संबंधित दुकानांनी नियुक्त केलेले नाही, अशी माहिती अ‍ॅमेझॉनच्या एका डिलव्हरी बॉयने सांगितले.

ग्राहकाने या कंपनीला ऑर्डर दिल्यानंतर संबंधित कंपनी वस्तू ग्राहकांना पाठवते. या वस्तू डिलव्हरी बॉय किंवा मिनीस्टोअर्सच्या माध्यमातून संबंधित ग्राहकांना मिळते. यासाठी डिलव्हरी बॉय किंवा लहान दुकानाला प्रत्येक डिलव्हरी मागे १३ रुपये दिले जाते. प्रत्येक डिलव्हरी बॉय महिन्याला सुमारे ७०० ते १००० घरांना भेटी देत असतो. तेव्हा त्यांना १३ हजार रुपये महिन्याला पडतात. परंतु  टाळेबंदीमध्ये त्यांची बिकट झाली आहे. या कंपन्यांनी या काळात डिलव्हरी बॉय आर्थिक संकटात येऊ नये म्हणून काही उपाययोजना केल्याचे दिसून येत नाही.