व्यापाऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया

कृषी प्रक्रिया उद्योगांना करमुक्ती आणि लघुउद्योगांची करपात्र उत्पन्न मर्यादा वाढवल्याने या क्षेत्रात अर्थसंकल्पाबाबत समाधान व्यक्त केले जात आहे.

विदर्भात जवळपास पंधरा हजाराहून अधिक छोटे-मोठे उद्योग या भागात आहेत. मागील अर्थसंकल्पात ५० कोटीपर्यंतची उलाढाल असणाऱ्या उद्योगांना २५ टक्के आयकर द्यावा लागत होता. आता ही मर्यादा २५० कोटींपर्यंत नेल्याने याचा फायदा मोठय़ा संख्येने विदर्भातील उद्योगांना होईल. त्याचप्रकारे

लघुउद्योगांसाठी सुमारे तीन हजार ७९४ कोटींची आíथक तरतूदही करण्यात आली आहे. कृषी क्षेत्राशी निगडित उद्योगांना १०० टक्के करमुक्त केल्याने याचेही स्वागत उद्योग जगतात करण्यात आले.

कृषी प्रक्रिया उद्योग मोठय़ा प्रमाणात विदर्भात सुरू होत आहे हे येथे उल्लेखनीय. आजारी उद्योगांना नवसंजीवनी देण्यासाठी केंद्राने कुठलेच पाऊल उचलले नाही, ही खेदाची बाब असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

आजारी उद्योगांची निराशा

केंद्र सरकारने ईझ ऑफ डुईंग बिझनेसची उद्योगांसाठी घोषणा केली. मात्र, आजही उद्योगांना सरकारदरबारी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. आजारी लघु उद्योगांची संख्या अधिक आहे, उद्योगांना अनेक अडचणी भेडसावत आहे.

अतुल पांडे, अध्यक्ष, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन

लघुउद्योगाना नवसंजीवनी

मुद्रा योजनेसाठी तीन हजार कोटींच्या तरतुदीमुळे लघुउद्योगांना नवसंजीवनी मिळेल. यातून रोजगार निर्मिती होईल. मात्र, त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न होणे गरजेचे आहे.

प्रभाकर देशमुख, अध्यक्ष चिल्लर किराणा विक्रेता संघ

संतुलित अर्थसंकल्प

अर्थसंकल्पात सर्वच घटकांना न्याय देण्यात आला आहे. छोटय़ा उद्योगांना न्याय देण्यात आला आहे.

बी.सी भरतिया, अध्यक्ष, कॅट

निराशाजनक

उद्योग आणि व्यापाऱ्यांची निराशा करणारा आहे. आयकर मर्यादा वाढली नाही. शिक्षण आणि आरोग्यक्षेत्रात अधिकचा एक टक्का सेस वाढवला. मात्र, या सेसच्या माध्यमातून जमा होणाऱ्या निधीचे काय करणार, याबाबत स्पष्टता नाही. रेल्वेमध्ये विदर्भाला वाटय़ाला नाहीच नाही.

हेमंत गांधी, अध्यक्ष नाग विदर्भ चेंम्बर्स ऑफ कॉमर्स

उद्योगांना चालना देणारा

२५० कोटींची उलाढाल असलेल्या उद्योगांवर कर आकारणी ३० टक्क्यांहून २५ टक्के कमी करण्यात आली आहे. त्याचबरोबर या क्षेत्रासाठी ३ हजार ७९४ कोटींची तरतूद करण्याचा निर्णय या क्षेत्राला चालना देणारा आहे.

जुल्फेश शहा, चार्टर्ड अकाऊंन्टट

सर्वसमावेशक

अर्थसंकल्पातून सर्वागिण विकासाचा सरकारचा हेतू स्पष्ट होतो. कृषी आणिआरोग्य क्षेत्राकडे अधिक लक्ष देण्यात आले आहे. आरोग्य सुविधा आणि शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या प्रयत्नाने अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल

  अरुण लखाणी, सीएमडी ओसीडब्ल्यू