बाबा नंदनपवार यांचा अमृत महोत्सवी सत्कार

शिक्षण क्षेत्रात विद्वानांची कमतरता नाही, पण बुद्धी विकून जीवन जगणारेही कमी नाहीत, असा टोला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिक्षकी पेशाला व्यावसायिकतेच्या मार्गावर नेणाऱ्या शिक्षकांना लगावला.

विदर्भ गौरव प्रतिष्ठान व दिवं. म.ल. मानकर शैक्षणिक विकास व सेवा प्रतिष्ठानच्यावतीने डॉ. बाबा नंदनपवार यांचा अमृत महोत्सवी सत्कार सोहोळा शंकरनगरातील साई सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी गडकरी बोलत होते. कृष्णा इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्स कराडचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा, ज्येष्ठ संपादक लक्ष्मण जोशी, अ‍ॅड. प्रकाश सोमलवार, अशोक मानकर, वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी आदी मान्यवर उपस्थित होते.

शिक्षक म्हणून बाबासाहेबांचे कार्य उत्तमच, पण त्याहीपेक्षा चौकटीच्या बाहेर विचार करून त्यांनी अनेक उपक्रम राबवले. यात पालक शाळा, मुख्याध्यापक शाळा यांचा उल्लेख प्रामुख्याने करावा लागेल, असे गडकरी म्हणाले. शिक्षक म्हणून विद्यार्थी घडवत असतानाच सामाजिक दायित्व आणि संवेदनशिलता जपणाऱ्यांमध्ये जी मोजकी नावे घेतली जातात, त्यात बाबासाहेब एक असल्याचे गडकरी म्हणाले.  बाबासाहेबांच्या पत्नी आणि मुलांनी केलेल्या त्यागामुळेच ते आज इथवर येऊन पोहोचले. विद्यार्थी परिपूर्णतेकडे लक्ष देणारा सात्विक कार्यकर्ता म्हणूान बाबासाहेबांचा उल्लेख करावा लागेल, असे लक्ष्मण जोशी म्हणाले. अहंकार, अपेक्षा दूर सारुन बाबासाहेब जगत आले आणि म्हणूनच त्यांची कधीही उपेक्ष जाली नाही, असे सांगून डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी बाबासाहेबांना आधुनिक ऋषीची उपमा दिली. बाबासाहेब आमच्या शाळेत आले आणि त्यांना आम्ही ऐकले तेव्हाच त्यांच्यातील कार्यकुशलतेची जाणीव जाली. ध्येयनिष्ठ जीवन जगणारा थोर पुरुष या शब्दात अ‍ॅड. प्रकाश सोमलवार यांनी त्यांचा गौरव केला. हा क्षण मी कायम स्मरणात ठेवील. माझ्या आयुष्यात आलेल्या माणसांनी मला मोठे केले. लोकांनी सांभाळून घेतल्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहचू शकलो, या शब्दात बाबा नंदनवार यानी कृतज्ञता व्यक्त केली.