उत्पन्न ३३६ कोटी ५३ लाखांचे तर तूट ५५ कोटींची; विद्यार्थीकेंद्रित योजनांकडे दुर्लक्ष

लोकसत्ता प्रतिनिधी

नागपूर : करोना काळात निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी कुठल्याही नवीन उपाययोजनांचा समावेश नसलेला ४२१ कोटी ५५ लाख ४७ हजारांच्या खर्चाचा व ५५ कोटी १ लाख ८० हजारांच्या तुटीचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा अर्थसंकल्प आज मंगळवारी मंजूर करण्यात आला.

विधिसभेच्या  अर्थसंकल्पीय बैठकीमध्ये व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. राजेश भोयर यांनी अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये एकूण उत्पन्न ३३६ कोटी ५३ लाख ६७ हजार दर्शवण्यात आले. करोनामुळे विद्यापीठाच्या परीक्षा आणि एकूणच शैक्षणिक व्यवस्थेवर गंभीर परिणाम होत आहे. त्यामुळे पालकांच्या मनात विद्यार्थ्यांच्या भविष्याची चिंता दूर करणाऱ्या काही विद्यार्थीकेंद्रित तरतुदींची अपेक्षा  होती. मात्र, विद्यापीठाने पारंपरिक अर्थसंकल्प सादर करून  केवळ औपचारिकताच पूर्ण केल्याचे दिसून येत आहे. विधिसभा सदस्य अ‍ॅड. मनमोहन वाजपेयी, सदस्य विष्णू चांगदे, संजय कविश्वर, प्रकाश रणदिवे यांनी अर्थसंकल्पीय चर्चेत भाग घेतला. तसेच विद्यापीठाकडून तूट भरून काढताना  विद्यार्थ्यांच्या शुल्कात वाढ नको, अशा सूचना दिल्या. सोबतच अर्थसंकल्पामध्ये कुठल्याही नवीन योजना, नवीन सुधारणांची तरतूद नसल्याने सदस्यांनी नाराजी दर्शवली. अर्थसंकल्पामध्ये नॅकला डोळ्यासमोर ठेवून अनेक तरतुदी केल्या असून याशिवाय शैक्षणिक विभाग, वसतिगृहे, ग्रंथालये व स्वच्छतागृहे आदी इमारतीच्या दुरुस्ती व देखभालीसाठी ७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. कंत्राटी शिक्षकांच्या वेतनासाठी ३ कोटींची तर तासिका शिक्षकांच्या वेतनासाठी ६ कोटी, विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी १ कोटी तर विद्यार्थी कल्याण योजनांसाठी ५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

क्रीडा संकुलासाठी ८ कोटी

यंदाच्या अर्थसंकल्पात काही नवीन नसले तरी पहिल्यांदाच विद्यापीठात नवीन क्रीडा संकुल तयार करण्यात येणार असून यासाठी अर्थसंकल्पामध्ये ८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय नवीन प्रशासकीय इमारतीमधील उर्वरित कामांसाठी ५ कोटींची तरतूद केली आहे

ऑनलाईन परीक्षेसाठी तरतूद नाही

परीक्षा विभागाचे संलग्नीकरण, परीक्षा सुधार व इतर आवश्यक उपकरणे खरेदी करण्यासाठी १६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, करोनामुळे भेडसावत असलेल्या ऑनलाईन परीक्षेसाठी कुठलीही तरतूद केल्याचे दिसून येत नाही. परीक्षा विभागाकडे येणाऱ्या उत्पन्नातून ८० टक्के रक्कम ही परीक्षा विभागातील सुविधांवर खर्च करण्याचा संकल्प विद्यापीठाने केला आहे.

‘नॅक’साठी ५ कोटी

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये विद्यापीठाला ‘नॅक’ चमू भेट देणे अपेक्षित आहे. विद्यापीठाच्या विविध विभागांचे संगणकीकरण, अभिलेख्यांचे डिजीटायझेशन, महिती तंत्रज्ञानाचा वावर, सौर ऊर्जेचा वापर आदींवर ‘नॅक’ चमूचा अधिक भर असतो. ही बाब लक्षात घेऊन ‘नॅक’साठी ५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.