ऑनलाईन पर्यायाकडे विद्यापीठाचे दुर्लक्ष

नागपूर : वर्षभरापासून करोनाचे सावट असल्याने व्हीएनआयटी व संस्कृत विद्यापीठाने ऑनलाईन पद्धतीने दीक्षांत सोहळा घेत विद्यार्थ्यांना पदव्यांचे वाटप केले.  मात्र, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा २३ एप्रिलला नियोजित १०८वा दीक्षांत सोहळा पुन्हा  रद्द होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे अन्य विद्यापीठांमध्ये ऑनलाईन सोहळे होत असताना नागपूर विद्यापीठाला ऑनलाईन कार्यक्रम घेण्यात अडचण काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

करोनामुळे शैक्षणिक वेळापत्रकच संकटात सापडले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नोव्हेंबर २०२० मध्ये अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षांना विलंब झाल्याने नियोजित दीक्षांत समारंभ काहीसा उशिरा होणे अपेक्षित होते. मात्र, याच कालावधीमध्ये ‘व्हीएनआयटी’ने आपला दीक्षांत सोहळा ऑनलाईन पद्धतीने घेतला. संस्कृत विद्यापीठानेही ऑनलाईन सोहळा घेत केवळ पुरस्कार विजेत्यांना विद्यापीठामध्ये बोलावले होते. या सोहळ्याला राज्यपाल विशेषत्वाने उपस्थित होते. पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठानेही ऑनलाईन सोहळ्याचे आयोजन केले. नागपूर विद्यापीठाने २३ एप्रिलला दीक्षांत सोहळा आयोजित केला होता. शासनाने करोनाचा प्रकोप बघता पुन्हा एकदा  टाळेबंदीची घोषणा केल्याने हा सोहळा रद्द करण्याचा विचार विद्यापीठाने केला आहे. मात्र, रद्द करण्यापेक्षा ऑनलाईन सोहळा घेतल्यास विद्यार्थ्यांना वेळेत पदवीचे वाटप करणेही शक्य होणार आहे. विधिसभा आणि विद्वत परिषदेच्या बैठका या ऑफलाईन पद्धतीने घ्या, अशी मागणी सदस्यांकडून करण्यात आल्यानंतरही विद्यापीठाने त्या ऑनलाईन घेतल्या. त्यामुळे ऑनलाईन बैठकांसाठी आग्रही असणाऱ्या विद्यापीठाला ऑनलाईन दीक्षांत सोहळा घेण्यास अडचण काय, असा प्रश्न समोर येत आहे.

विशेष दीक्षांत सोहळाही लांबणीवर

विद्यापीठाद्वारे ११ एप्रिलला विशेष दीक्षांत समारंभात सरन्यायाधीश शरद बोबडे यांना ‘कायदे पंडित’ (एलएलडी) मानद उपाधीने सन्मानित करण्यात येणार होते. मात्र, १६ मार्चला राष्ट्रपती कार्यालयाकडून नकार मिळाल्याने विशेष दीक्षांत सोहळा रद्द करण्यात आला. आता नव्या तारखेसाठी राज्यपाल आणि सरन्यायाधीशांकडे संपर्क साधण्यात आला आहे. विशेष म्हणजे, २३ एप्रिलला शरद बोबडे यांचा सरन्यायाधीश पदाचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. त्यामुळे त्यापूर्वी त्यांना ‘कायदे पंडित’ या मानद उपाधीने सन्मानित करण्याच्या अनुषंगाने विद्यापीठाची धडपड सुरू आहे.