गडकरी यांची खंत, एमआयडीसीत मेट्रो कारखाना

नागपूर : विद्यापीठात वेगवेगळ्या क्षेत्रात संशोधने व्हायला हवीत. मात्र, आपली विद्यापीठे कोळसा, कृषी, वन, पर्यटन याबाबतीत कोणतेही संशोधनात्मक काम करताना दिसत नाही. मिहानमध्ये एचसीएल आले. त्यांनी ३०० ते ४०० लोकांना रोजगार दिला. १२ हजार लोकांना ते आणखी रोजगार देणार आहेत, परंतु मिहानमधील या प्रकल्पांमध्ये नोकरी मिळवून देणारे अभ्यासक्रम विद्यापीठात नाहीत, अशी खंत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.

शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात रविवारी विद्यापीठ शिक्षण मंचातर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. कल्पना पांडे तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार कपिल पाटील, आमदार अनिल सोले, आमदार नागो गाणार, आमदार डॉ. मिलिंद माने आणि पंकज भोयर उपस्थित होते.

गडकरी पुढे म्हणाले, विद्यापीठ शिक्षण मंचाने निवडणुकीपुरताच विचार न करता माझ्यासारख्या माजी विद्यार्थ्यांला अभिमान वाटेल, अशी कामगिरी करून दाखवावी. जातीपातीच्या पलीकडे जाऊन श्रेष्ठ विरोधकालाही योग्य ती मदत करावी. एक खंत नेहमी वाटायची की आम्ही ग्रामपंचायत, पंचायत समिती, महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका जिंकल्या पण विद्यापीठात सत्ता नव्हती. मात्र, आता ती खंत राहिली नाही. सगळ्या जातीपातीच्या श्रेष्ठ लोकांना आम्ही पक्षात स्थान दिले आहे. कारण, जातपात, धर्माच्या पलीकडे गुणवत्तेने माणूस मोठा होतो. विद्यापीठात नवनवीन संशोधने, नवउपक्रम व्हायला हवेत. जेणेकरून गुणवत्तेच्या आधारावर जागतिक स्तरावर ओळख निर्माण होईल. मात्र, विधान परिषदेतील शिक्षक आमदार नेहमीच शिक्षकांचे वेतन, भत्ते, अनुदान या विषयावर बोलत असतात. मात्र, शिक्षणातील गुणवत्तेच्या बाबतीत कोणी बोलत नाही, याकडेही गडकरींनी लक्ष वेधले.

भारतीय रेल्वे, नागपूर मेट्रो आणि महाराष्ट्र शासन मिळून आम्ही एमआयडीसीमध्ये ब्रॉड गेझ मेट्रो कारखाना उभारणार आहोत, असेही गडकरींनी सांगितले.

मी विरोधकांमध्येही लोकप्रिय

विदर्भातील लोक जात, धर्म, संप्रदाय पोटजातीतही अडकून बसतात. जातीपातीने नव्हे तर मनुष्य त्याच्या गुणवत्तेने मोठा असतो. विरोधक असला तर त्यालाही मदत करायला हवी. मी विरोधकांचीही कामे करीत असतो. म्हणून मी विरोधकांमध्येही लोकप्रिय आहे. केरळमध्ये काँग्रसचे चंडी यांचे सरकार होते. त्यांनी माझा जाहीर सत्कार करून मी केलेल्या चांगल्या कामांचे कौतुक केले. समाजवादी पक्षाचे मुलायमसिंग यादव असोत की लालूप्रसाद यादव यांची कामे मी केली आहेत. एवढेच नव्हे तर सीपीएमचे नेते, सोनिया गांधी, राहुल गांधींचीही कामे मी केली आहेत. गरीब माणसाला फायदा होत असेल तर कायदाही तोडला पाहिजे. हेच तर गांधींनी सांगितले होते, याची आठवणही गडकरींनी यावेळी करून दिली.