विद्यापीठाचा निरंतर प्रौढशिक्षण आणि विस्तार विभाग लोकप्रिय

फारसे ऐकिवात नसणारे, असूनही नसल्यासारखे वाटणारे आणि सामान्यत: दुर्लक्षित असूनही १०० टक्के नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणारे काही आडमार्गी अभ्यासक्रम विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहेत. राज्यातील अन्य विद्यापीठांमध्ये असे अभ्यासक्रम असू शकतील.

दरवर्षी परीक्षा होणे, त्याचे निकाल लागणे आणि नंतर उत्तीर्ण होणाऱ्यांचे कौतुक होणे आलेच. त्याचबरोबर पास किंवा काठावर पास होणाऱ्यांची संख्याही मोठीच असते. हल्ली तर २० गुण शाळाच देतात, तरीही विद्यार्थी काठावर उत्तीर्ण होतात. अशा विद्यार्थ्यांनाही जगण्याच्या प्रश्नांना तोंड द्यावेच लागते. तेव्हा हे आडमार्गी, कमी दिवसांचे अभ्यासक्रमच नागपुरातील नागपुरात नोकरीच्या संधी उपलब्ध करून देतात आणि हे सर्व अभ्यासक्रम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील निरंतर प्रौढ शिक्षण आणि विस्तार विभागाद्वारे चालवले जातात. या आडमार्गी अभ्यासक्रमांपैकी काही अभ्यासक्रम तर १०० टक्के रोजगार उपलब्ध करून देणारे आहेत. पद्मश्री विकास महात्मे, डॉ. उखळकरांसारखे नावाजलेले डॉक्टर्स यांच्याकडे किंवा यांच्या ओळखीने डायलिसिस किंवा ऑप्थॉल्मिक सहाय्यक म्हणून हमखास नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. कामठीतील कॅन्टॉनमेंटमधील ब्रिगेडियरने विद्यापीठाशी करार करून ऑफिस मॅनेजमेंटचा अभ्यासक्रमही त्यासाठीच चालवला जातो.

नववी ते एम.ए. उत्तीर्ण झालेल्यांसाठी शिकण्याची संधी या अभ्यासक्रमांनी उपलब्ध केली आहे. त्यामुळे सहा महिन्यांचे, आठ किंवा नऊ महिन्यांचे अभ्यासक्रम ४ हजारांपासून १० हजारांपर्यंत रोजगार उपलब्ध केवळ नागपुरातच नव्हे, तर विदर्भातील विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊन नागपूरबाहेरही नोकरी मिळवतात.

यासंदर्भात निरंतर प्रौढ शिक्षण आणि विस्तार विभागातून सेवानिवृत्त झालेले संचालक प्रा.डॉ. जयमाला डुमरे म्हणाल्या, जस जशी लोकांनी मागणी केली तस तसे अभ्यासक्रम तयार करून आम्ही अभ्यास मंडळाची मंजुरी घेतली. केवळ नागपुरातच नव्हे, तर बाहेरही विद्यार्थी नोकऱ्या मिळवतात. विद्यार्थ्यांना हमखास नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणारे हे अभ्यासक्रम आहेत.

स्वयंनिर्वाहित प्रमाणपत्र अभ्यासक्रम

बालशिक्षिका प्रमाणपत्र अभ्यासक्रम, रुग्णालय सहायक, ऑप्थॉल्मिक सहाय्यक, डायलिसिस तंत्रज्ञ सहाय्यक, फंक्शनल अरेबिक, क्राफ्ट टिचर, अ‍ॅटोकॅड अ‍ॅंड रेवित आर्किटेक्ट, तर्कशास्त्राद्वारे कार्यक्रमांचे नियंत्रण आणि डाटा संपादन, ऑफिस मॅनेजमेंट, संशोधन पद्धती आणि सामाजिक शास्त्रे संशोधन पद्धती, तसेच सामाजिक शास्त्रे, अशा १४ अभ्यासक्रमांपैकी काही तीन, काही सहा, तर काही नऊ महिन्यांचे आहेत.

१६ अभ्यासक्रम

जीवनशिक्षण अभियानांतर्गत संवाद कौशल्य, कुकरी अ‍ॅण्ड फूड प्रिझर्वेशन, सौंदर्यकार, मराठी आणि अमराठी भाषा, ड्रेस मेकिंग आणि फॅशन ब्युटिफिकेशन, पत्रकारिता, व्यक्तिमत्त्व विकास आणि संवाद कौशल्य, पंचायत राज आणि ग्रामीण प्रशासन, बँकिंग आणि आर्थिक सेवा, योगा आणि मानसिक आरोग्य, संशोधन पद्धत आणि सांख्यिकी तंत्र, फॅशन डिझायनिंग, अकाउंटिंग आणि सांख्यिकीय तंत्र, फॅशन डिझायनिंग, अकाउंटिंग प्रॅक्टिस आणि टॅक्सेशन, सांख्यिकीय पद्धत आणि इतर, असे १६ अभ्यासक्रम ४० तासांपासून ते सहा महिने, अशा कालावधींचे आहेत.