नागपूर शहरात आज अवकाळी पाऊस पडल्याने ‘विकेन्ड’चा मुहूर्त साधून दुपारी फिरायला निघालेल्यांना त्याचा फटका बसला. काही भागात गारपीट देखील झाली. ग्रामीण भागात झालेल्या गारपिटीचा पिकांना फटका बसला.

दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. आजही सकाळपासून असे वातारवरण होते. त्यामुळे दुपारी बाहेर पडण्याच्या तयारीत असलेल्या अनेकांना त्यांचा बेत रद्द करावा लागला. सकाळी साडेअकराच्या सुमारास रामदासपेठ, सक्करदरा, नंदनवन, पश्चिम नागपूरसह इतरही काही भागात पावसाच्या जोरदार सरी आल्या. अनेक भागात एक ते दीड तास पाऊस सुरू होता. साधारणत: दुपारी दोन वाजेपर्यंत बरसलेल्या सरींनी नंतर उसंत घेतली. यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले होते. या पावसामुळे रविवारची सायंकाळ मात्र गारव्यात लोकांना अनुभवता आली. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला. थंडीही भरू लागली. त्यामुळे अनेकांना पुन्हा उलनचे कपडे बाहेर काढावे लागले.

रविवार असल्याने रस्त्यावर गर्दी कमी होती, परंतु लग्न कार्यासाठी निघालेल्यांची पंचाईत झाली. विदर्भातील इतर जिल्ह्य़ातील अवकाळी पावसाने हजेरी लावली. नागपूरसह काही जिल्ह्य़ात गारपीट झाली. आज नागपुरातील कमाल तपामान २९ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १५.५ अंश सेल्सिअवर आले. वेधशाळेच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस गडगडाटी वादळ, गारपीट आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे.