26 September 2020

News Flash

आगामी निवडणुकीत तिसरा पर्याय म्हणून शेतकरी संघटना एकत्र येणार

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असताना शेतकऱ्यांना कर्जातून मुक्तता मिळाली नाही.

सुकाणू समितीचे प्रमुख रघुनाथदादा पाटील यांचा दावा

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस गंभीर नाही. केवळ सत्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांचा  वापर केला जातो. त्यामुळे या राजकीय पक्षांना शह देण्यासाठी आगामी निवडणुकीत तिसरा पर्याय म्हणून सर्व शेतकरी संघटना एकत्र येणार आहेत. त्या दृष्टीने प्रत्येक जिल्ह्य़ात काम सुरू झाले असल्याची माहिती शेतकरी संघटनेच्या सुकाणू समितीचे प्रमुख रघुनाथदादा पाटील यांनी दिली.

राज्य सरकारने गेल्या साडेचार वर्षांत शेतकऱ्यांच्या बाबतीत ज्या काही घोषणा केल्या आहेत त्या सर्व फसव्या आहेत. कर्जमाफीवरून केवळ आश्वासन दिले जात आहे. त्याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतकऱ्यांविषयी कळवळा नाही. सरकारने विश्वासार्हता गमावली आहे आणि त्याचे परिणाम आगामी निवडणुकीत दिसतील, असे रघुनाथदादा म्हणाले.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असताना शेतकऱ्यांना कर्जातून मुक्तता मिळाली नाही. यूपीए सरकारने नियुक्त केलेल्या स्वामीनाथन आयोगाने शेतकऱ्यांना उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा असा भाव देण्याची शिफारस २००६ मध्ये केली. मात्र, त्याची अंमलबजावणी केली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हल्लाबोल आंदोलन करीत आहे. मात्र, त्यांचे आंदोलन केवळ राजकीय फायद्यासाठी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर आगामी निवडणुकीत तिसरा पर्याय म्हणून सर्व शेतकरी संघटना आणि नेते एकत्र येणार आहेत आणि त्यावर गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. केवळ राज्यात नाही तर देशभरात कुठल्याही राजकीय पक्षाचे समर्थन न घेता तिसरा पर्याय उभा केला जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. शिवसेनेने कर्जमुक्तीवरून आंदोलन केले. मात्र, तो सुद्धा दिखावा आहे. सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन जर ठराव मांडला तर शेतकऱ्याचे कर्ज माफ होऊ शकते. मात्र, या पक्षांना शेतकऱ्यांना केवळ झुलवत ठेवायचे आहे, असा आरोप त्यांनी केला.

१४ मे रोजी जेलभरो आंदोलन

राज्यातील ४० शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीच्या वतीने हुतात्मा अभिवादन शेतकरी जागर यात्रा काढण्यात आली आहे आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी होणार नाही आणि उत्पादन मालाला भाव मिळणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची घोषणा करण्यात आली. १४ मे रोजी राज्यात जेलभरो आंदोलन केले जाणार आहे, असे रघुनाथदादा पाटील यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2018 12:59 am

Web Title: upcoming indian general election 2019 farmers organization raghunath dada patil
Next Stories
1 आर्थिक मदतीसाठी एम्प्रेस मॉलमध्ये तीन मृतदेह ठेवून आंदोलन
2 भारतीय मजदूर संघाकडे लोकांचा कल कमी
3 आता जैविक कचऱ्यावरून संबंधित अधिकारी, कंत्राटदारावर कारवाई
Just Now!
X