14 December 2017

News Flash

भाजपची ‘घरघर’ मोहीम

भाजप घराघरात पोहोचल्याचा दावा करीत आहे, तर काँग्रेसने बुथवर लक्ष केंद्रित केले आहे.

प्रतिनिधी, नागपूर | Updated: June 17, 2017 2:48 AM

 

  • काँग्रेसचे बुथपातळीवर लक्ष
  • लोकसभा निवडणुकीची तयारी

आगामी लोकसभा निवडणूक आणि सध्या होत असलेल्या मध्यावधी निवडणुकीची चर्चा या पाश्र्वभूमीवर भाजप आणि काँग्रेसने संघटना बांधणीची प्रक्रिया जोमात सुरू केली आहे. भाजप घराघरात पोहोचल्याचा दावा करीत आहे, तर काँग्रेसने बुथवर लक्ष केंद्रित केले आहे.

केंद्रातील सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या पाश्र्वभूमीवर भाजपने देशपातळीवर २०१९च्या लोकसभा निवडणूक तयारीला कार्यविस्तार योजनेतून सुरुवात केली आहे. अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर गुरुवारी भाजपने या योजनेचा लेखाजोखा जाहीर केला. त्यानुसार भाजपने आतापर्यंत १९३९ पैकी १४४९ बुथ कार्यकर्त्यांशी संपर्क साधला आहे. त्याचबरोबर २ लाख २५ हजार घरांशी संपर्क साधण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

दुसरीकडे काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पक्ष बांधणी आणि संघटनात्मक निडणुकीची प्रक्रिया सुरू केली आहे. १४ मे २०१७ पर्यंत १९०० बुथवर कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे शहर काँग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे यांच्याकडून सांगण्यात आले. शहरातील सहाही विधानसभा मतदारसंघात बुथ स्तरावर सभासद नोंदणी करण्यात आली असून ८० टक्के बुथवर उत्तम प्रतिसाद मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. महापालिका काँग्रेसमध्ये दोन गट असले तरी पूर्व नागपुरात सर्वाधिक सभासदांची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ दक्षिण नागपूरचा क्रमांक लागतो. दक्षिण-पश्चिम, पश्चिम आणि उत्तर नागपुरात सभासद नोंदणी कमी झाली आहे. बुथ समिती गठित करण्यासाठी किमान २५ सदस्यांची नोंदणी करणे बंधनकारक होते. त्यानुसार १९०० बुथवर सभासद नोंदणी झाल्याचा दावा करण्यात येत आहे. आता एक बुथ अध्यक्ष, एक ब्लॉक प्रतिनिधी निवडण्यात येणार आहे. या सदस्य नोंदणीच्या आधारचे शहराध्यक्ष निवडण्यात येणार आहेत.

भाजप सत्तेत असूनही कार्यविस्तार योजनेला पक्षातील नाराजीचा फटका बसला. सुरुवातीला या योजनेसाठी कार्यकर्ते मिळत नव्हते आणि मिळाले तरी त्यांच्यात उत्साह दिसून येत नव्हता, दुसरीकडे काँग्रेस सत्तेबाहेर असल्याने आणि पक्षातील गटबाजीमुळे संघटनात्मक बांधणीवर परिणाम झाल्याचे दिसून आले.

१९०० बुथवर सदस्य नोंदणी

काँग्रेसने पक्ष संघटना बांधण्यासाठी मतदारसंघात तीन ब्लॉक केले आहे. शहरातील एकूण ब्लॉकमध्ये १९०० बुथ आहेत. प्रत्येक बुथवर सदस्यांची नोंदणी करण्यात आली आहे. प्रत्येकमध्ये अध्यक्ष निवडून त्याची ११ सदस्यांची कार्यकारिणी स्थापन करण्यात आली आहे. अशाप्रकारे बुथपर्यंत काँग्रेस पोहोचली आहे.

२ लाख २५ हजार घरांना भेटी

दक्षिण-पश्चिममध्ये एकूण बुथ ३१८ असून २६० बुथपर्यंत भाजप पोहोचले आहे. दक्षिणमध्ये ३३८ बुथ असून ३२८ पर्यंत पोहोचले. पूर्व नागपुरात ३०० बुथ असून १६० बुथवर संपर्क साधण्यात आला. मध्य नागपुरात ३४१ बुथ आहेत, त्यापैकी २६०, उत्तर नागपुरात ३४१ बुथ असून १९०, पश्चिम नागपुरात ३५१ बुथ असून २५० बुथपर्यंत भाजप पोहोचल्याचा आणि २ लाख २५ हजार घरांना भेटी दिल्याचा दावा केला आहे.

First Published on June 17, 2017 2:48 am

Web Title: upcoming lok sabha election congress bjp