प्रतिबंधित औषधांची तस्करी करणाऱ्या नागपूरच्या एका व्यापाऱ्याला अमेरिकेतील न्यायालयाने दोषी धरून २० वष्रे कारावासाची शिक्षा ठोठावली. जितेंद्र हरिश बेलानी (३७) असे व्यावसायिकाचे नाव आहे.

नशा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या काही औषधांवर अमेरिका खंडात प्रतिबंध आहे. या औषधांची विक्री व व्यापार यांच्याविरुद्ध अंमली पदार्थ तस्करी अंतर्गत कारवाई करण्यात येते. तरीही जितेंद्र बेलानी हा भारतातून ती औषधे अमेरिका खंडात पाठवायचा. सीमा शुल्क विभागाला गुंगारा देण्यासाठी तो डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार देण्यात येणारी औषधेच अमेरिका खंडात पाठवत असल्याचे सांगायचा. पण, जून २०१९ मध्ये झेन प्रजासत्ताक राज्यात त्याला प्रतिबंधित औषधांची तस्करी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. त्यानंतर त्याचे अमेरिकेकडे प्रत्यार्पण करण्यात आले.  एका भारतीय कंपनीकडून औषधे आयात करून ती अमेरिकेत विकण्याचा  ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून मुख्य फेडरल न्यायालयात खटला चालवण्यात आला. या प्रकरणी सर्व पक्षांची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने त्याला २० वर्षांची शिक्षा ठोठावली.