12 July 2020

News Flash

पर्यावरण मंत्रालयाचा अहवाल डावलून औष्णिक केंद्रातील राखेचा शेतीत वापर

महानिर्मितीच्या कोराडी, खापरखेडा प्रकल्पातील राखेचा अशा कारणासाठी वापर होत आहे

(संग्रहित छायाचित्र)

महेश बोकडे

किरणोत्सर्गाबरोबर मानवी आरोग्याला अपायकारक खनिजे

कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्पातील राखेत किरणोत्सर्गाबरोबर मानवी आरोग्याला अपायकारक खनिजे असल्याने त्याचा शेतीत वापर करू नये, असे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने अहवालात म्हटले असले तरी शेतीतील मातीचा दर्जा सुधारण्याच्या नावाखाली या राखेचा सर्रास वापर होत असल्याचे दिसून आले आहे.

२०१५ मध्ये पर्यावरण मंत्रालयाने कोराडी प्रकल्पातील राखेची तपासणी केली असता त्यात किरणोत्सर्गाबरोबर मानवी आरोग्याला अपायकारक खनिजे आढळली. राज्य वीज निर्मितीच्या(महानिर्मिती) मुंबई मुख्यालयास  सादर केलेल्या अहवालात ही राख शेतीसाठी वापरू नये, असे नमूद केले होते. औष्णिक राख गाळून ती शेतीत भूसुधारक म्हणून वापरण्यासाठी शेतकऱ्यांना विकली जाते. हिंगणा रोडवरील परीन इंटरनॅशनलसह अन्य कंपन्या त्याची विक्री करतात.

परीन कंपनी वर्षांला ७०० टनाहून अधिक राखेची खापरखेडातून उचल करते. राखेची महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये विक्री केली जाते. मात्र, राखेतील किरणोत्सर्ग करणाऱ्या अपायकारक खनिजामुळे नागरिकांच्या प्राणास होणाऱ्या धोक्यास कोण जबाबदार, हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

महानिर्मितीच्या कोराडी, खापरखेडा प्रकल्पातील राखेचा अशा कारणासाठी वापर होत आहे. नागपूर जिल्ह्य़ातील कोराडी औष्णिक विद्युत केंद्रात ६६० मेगावॅटचे तीन, २१० मेगावॅटचा १ आणि २२८ मेगावॅटचा एक असे एकूण पाच तर खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रात २१० मेगावॅटचे ४ आणि ५०० मेगावॅटचे १ असे पाच विद्युत निर्मिती संच आहेत. दोन्ही प्रकल्पांना वीज उत्पादनासाठी वेकोलिसह इतर काही कंपन्यांकडून जवळच्या खाणीतून कोळसा पुरवठा होतो. कोराडीत रोज सुमारे ४५ हजार १०० टन तर खापरखेडा प्रकल्पाला ३३ हजार ६०० टन कोळशाची गरज आहे.

पाकिटावर परराज्याचा पत्ता

परीन इंटरनॅशनलच्या हिंगणा रोडवरील कारखान्यात ५० किलोच्या राखेचे पॅकिंग केले होते. भू- सुधारक नावाने विकल्या जाणाऱ्या या बॅगवर नागपूरऐवजी सागरचा पत्ता आहे. हा गंभीर प्रकार असतानाही संबंधितांचे त्याकडे दुर्लक्ष होते आहे.

औष्णिक राखेबाबत कृषी विद्यापीठासह इतरही संस्थांचे वेगवेगळे म्हणणे आहे. या विषयावर आणखी संशोधनाची गरज आहे. मात्र, हा विषय गंभीर असल्याने विविध खात्याचे अहवाल तपासले जातील. तक्रार आल्यास कंपन्यांची तातडीने चौकशी केली जाईल.’

– हेमा देशपांडे, उपविभागीय अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, नागपूर

परीन इंटरनॅशनल  कोराडी नव्हे तर खापरखेडा औष्णिक विद्युत प्रकल्पातील इलेक्ट्रो मॅग्नेटिक फ्लाय अ‍ॅशचाच भू- सुधारक म्हणून वापर करते. त्यात  सिलीकॉनसह इतरही १६ प्रकारचे जमिनीला फायदा देणारे सूक्ष्म घटक असतात. कृषी विद्यापीठानेही ही राख फायद्याची असल्याचे सांगितले आहे. पूर्वी हिंगणा मार्गावर काही वेळ उत्पादन घेतले. सध्या सागरच्या युनिटमधूनच उत्पादन घेतले जाते.

– सुवेक देवतळे, प्रोपरायटर, परीन इंटरनॅशनल, नागपूर.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 5, 2019 1:40 am

Web Title: use of ash farming in thermal center
Next Stories
1 विरुद्ध दिशेने वाहन चालवल्यास ‘सदोष मनुष्यवध’चा गुन्हा
2 विजय दर्डाविरुद्ध चौकशीसाठी सरकारकडे परवानगी मागितली
3 कुख्यात उत्तम बाबाच्या हल्ल्यात चमचम गंभीर
Just Now!
X