सर्पदंशावरील औषध तयार करण्यासाठी भारतातील सर्वाधिक प्राचीन आदिवासी जमातीच्या पारंपरिक ज्ञानाचा वापर केला जात आहे. जगभरात दरवर्षी ३० ते ४० हजार लोक सर्पदंशाने मृत्युमुखी पडतात. त्यातील २५ टक्के म्हणजेच दहा हजार लोकांचा मृत्यू भारतात होतो.

तामीळनाडू आणि केरळच्या सिमेवर ‘ईरुला’ या आदिवासी जमातीचे वास्तव्य आहे. पारंपरिक औषधे तयार करणे तसेच उपचाराच्या पद्धतीत ते तज्ज्ञ आहेत. केवळ त्या आधारावर उदरनिर्वाह शक्य नसल्याने २०व्या शतकात सापांच्या शिकारीचे आयुध त्यांनी वापरले. सापांना पकडून त्यांच्या कातडीवर प्रक्रिया करुन ते विदेशात पाठवल्यानंतर त्यांना मोठय़ा प्रमाणात पैसा मिळत होता.

दरम्यान, वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत सापांना पकडण्यावर बंदी आल्यामुळे या जमातीजवळ रोजगाराचे कोणतेही साधन राहीले नाही. मात्र, या काळात सापांना पकडण्यापासून त्यांना हाताळण्यापर्यंतचे त्यांचे कौशल्य कुणाकडेही नव्हते. रॉम्युलस व्हायटेकर या सर्पतज्ज्ञ आणि वन्यजीव संवर्धकांने काही वर्ष ‘इरुला’ या आदिवासी जमातीसोबत काम केले होते. त्यामुळे त्यांचे कौशल्य आणि त्यांच्या समस्यांची जाण त्यांना होती.  आदिवासींच्या या कौशल्याचा वापर करुन त्यांना अधिकृतरित्या रोजगार मिळवून देण्यासाठी चेन्नई येथे त्यांनी ‘इरुला स्नेक कॅचर्स’ ही सहकारी संस्था स्थापन केली. सापाचे संवर्धन आणि सर्पदंशावरील औषध तयार करण्यासाठी ही संस्था स्थापन झाली.

या संस्थेने स्थापनेपासूनच भारतातील सर्पदंशाच्या उपचारात क्रांती घडवली. देशभरातील रुग्णालयात पुरेशा प्रमाणात सर्पदंशावरील औषधे(अ‍ॅन्टीव्हेनम) पोहचवणे शक्य होऊ लागले. सापांचा मार्ग आणि इतर चिन्हांवरुन ही जमात सापांना शोधून काढते. तीन ते चार आठवडे सापांना बंदिस्त ठेवून त्यांचे विष काढल्यानंतर या सापांना जंगलात किंवा शेतजमिनीवर सोडले जाते. आजपर्यंत त्यांनी विष काढून सोडलेले साप मोठय़ा प्रमाणात मृत्युमुखी पडले असे झाले नाही.

याउलट सोडण्यात आलेल्या सापांच्या जगण्याचा दर अधिक आहे. गेल्या १५ वर्षांपासून हा प्रकल्प सुरू आहे. सापांना पकडून त्यांचे विष काढण्याच्या कौशल्यापासून तर त्यावर प्रक्रिया करेपर्यंतचा त्यांचा प्रवास मोठा आहे. भारतातील सर्वाधिक सर्पदंशावरील औषध तयार करणारी ही सहकारी संस्था आहे.