रेल्वे संकेतस्थळ, फेसबुक पेजला भेट देणाऱ्यांची व त्यावर मते व्यक्त करण्याची संख्या दोन महिन्यांत लाखोंवर
नागपूर मेट्रो रेल्वेतून प्रवास करण्याचे नागपूरकरांचे स्वप्न साकार होण्यास अद्याप अवधी असला तरी लोकसंवादातून या प्रकल्पाविषयी जनमत जाणून घेण्याचा व त्यासाठी समाज माध्यमाचा वापर करण्याचा मेट्रो रेल्वे व्यवस्थापनाचा प्रयोग कमालीचा यशस्वी ठरू लागला आहे. मेट्रो रेल्वेच्या संकेतस्थळाला व फेसबुक पेजला भेट देणाऱ्यांची व त्यावर मते व्यक्त करण्याची संख्या दोन महिन्यात लाखोंच्या घरात गेली आहे.
आठ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च येणाऱ्या नागपूर मेट्रो प्रकल्पाकडे सर्वच नागपूरकरांचे लक्ष लागले आहे. सरकारी किवा निमसरकारी प्रकल्प म्हटला की त्याला लागणारा विलंब, त्यामुळे लोकांची ओढवलेली नाराजी ही नित्याची बाब झाली आहे. यातून हजारो कोटी खर्च करून निर्माण होणाऱ्या प्रकल्पाच्या तसेच त्यासाठी राबणाऱ्या यंत्रणेच्या प्रतिमेवरही विपरित परिणाम होतो. नागपुरातील ‘रामझुला’ हे त्याचे अलीकडच्या काळातील उदाहरण ठरावे. मेट्रो व्यवस्थापनाने प्रकल्प उभारणी करतानाच त्यात लोकसहभाग वाढविण्याच्या दृष्टीकोनातून ‘लोकसंवादा’वर भर दिला. ज्यांच्यासाठी ही मेट्रो धावणार आहे त्यांना तिच्याबाबत काय वाटते हे जाणून घेण्यावर भर दिला. मेट्रोलाही ‘माझी मेट्रो’ असे नाव देऊन थेट नागपूरकरांच्या हृदयात हात घातला. यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून या प्रकल्पाची खडा न् खडा माहिती लोकांपर्यंत पोहोचविली. त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसून येत आहे. मेट्रोच्या संकेतस्थळाला, फेसबुक पेजला भेट देणाऱ्यांची व त्यावर या प्रकल्पाविषयी आपुलकीने मत व्यक्त करणाऱ्यांची संख्या लक्षात घेतली तर या प्रकल्पाविषयी नकारात्मक मत निर्माण होऊ न देण्यात व्यवस्थापन यशस्वी झाल्याचे दिसून येते. अनेकांनी या प्रकल्पाविषयी सूचनाही केल्या आहेत.
अनेक वेळा मोठय़ा प्रकल्पांच्या कामाबाबत कोणतीच माहिती जनतेपर्यंत पोहोचत नाही, ही बाब सुद्धा त्या प्रकल्पाच्या कामाविषयी शंका निर्माण करणारी ठरते. मात्र मेट्रो व्यवस्थापनाने दररोज या प्रकल्पाचे ‘अपडेट्स’ देणे सुरु केले आहेत. कुठे काम सुरु आहे, त्याची सध्यास्थिती, कुठे सुरु होणार आहे, कसे होणार आहे, त्यासंदर्भातील तांत्रिक माहिती आदींची इत्यंभूत माहिती समाज माध्यमाच्या माध्यमातून जनतेपुढे ठेवली जाते. या माहितीच्या आधारे अनेक जण शंकाही व्यक्त करतात. त्याचे निरसनही अधिकाऱ्यांकडून ऑनलाईनच केले जाते. प्रश्नोत्तराच्या या संवादातून प्रकल्पाविषयी सकारात्मक जनमत निर्माण केले जाते.
नागपूर आणि परिसरातील नागरिकांसाठी मेट्रो रेल्वे धावणार आहे. प्रत्येक नागपूरकरांना ती ‘माझी मेट्रो’ वाटावी यासाठी त्यांचा प्रकल्पात सहभाग वाढविणे गरजेचे आहे. हीच बाब लक्षात घेऊन समाज माध्यमाच्या माध्यमातून त्यांच्याशी संवादाची प्रक्रिया सुरू केली. यावर येणाऱ्या प्रतिक्रियांवरून हा प्रयोग यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे.
एस. एम. आपटे,
उपमहाव्यवस्थापक, नागपूर मेट्रो रेल्वे कंपनी