प्रकाश आंबेडकरांना काँग्रेससोबत युती करण्यात काही रस आहे असं वाटत नसल्याचं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसबरोबर युती करण्याची तयारी दाखवून वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला ४० जागा देऊ केल्या आहेत. या प्रस्तावावर दहा दिवसांत उत्तर द्यावे, अशी निर्वाणीची मुदतही आघाडीच्या नेत्यांनी काँग्रेसला दिली आहे. यावर प्रतिक्रिया देताना प्रकाश आंबेडकर यांना याबाबत गांभीर्य नाही असं दिसत आहे असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं.

‘प्रकाश आंबेडकर यांना आघाडी करण्यात रस नाही असं वाटत आहे. तुमच्यासाठी ४० जागा सोडतो असं म्हणणं चुकीचं आहे. आम्ही कायम चर्चा करण्यास तयार आहोत. बैठकीत जे काही जागावाटप होईल त्यानंतर निर्णय होईल’, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

वंचित बहुजन आघाडीचाच काँग्रेसला ४० जागा देण्याचा प्रस्ताव

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने भाजपचा ब संघ म्हणून काम केले, असा काँग्रेसने आरोप केला होता. यासंबंधी बोलताना वंचित बहुजन आघाडी भाजपाची बी टीम आहे असं सिद्ध करणारा कोणता पुरावा माझ्याकडे नाही पण त्यांच्या वक्तव्यावरुन तसंच वाटत आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसने सप्रमाण, कागपत्रांसह सिद्ध करून दाखवावे, अन्यथा आघाडीला मतदान करणाऱ्या ४१ लाख मतदारांची माफी मागावी, अशी मागणी याआधीच केली आहे.

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर विधानसभा निवडणुकीत अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीबरोबर समझोता करण्याचा विचार काँग्रेसमध्ये सुरू आहे. अलीकडेच राहुल गांधी यांनी दिल्लीत राज्यातील वरिष्ठ काँग्रेस नेत्यांची बैठक घेतली, त्यातही वंचित आघाडीबरोबर युती करण्याबाबत चर्चा झाली. आघाडीबरोबर बोलणी करण्यासाठी माणिकराव ठाकरे व हर्षवर्धन पाटील या नेत्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मात्र आता वंचित आघाडीने वेगळाच सूर लावल्यामुळे काँग्रेसबरोबर निवडणूक समझोता होण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.