News Flash

रस्त्यावरचे प्लास्टिक, अडगळीतल्या लोखंडातून सुबक कलाकृती

ओला व सुका कचऱ्यासोबत भांडेवाडीत या निकामी साहित्याचे विलगीकरण केले जाते.

(संग्रहित छायाचित्र)

इंदौर शहराच्या धर्तीवर महापालिकेचा कल्पक पुढाकार

राम भाकरे, नागपूर

स्वच्छ व सुंदर नागपूर घडवण्यासाठी स्वच्छ सव्‍‌र्हेक्षणांतर्गत शहरातील विविध भागात विविध उपक्रम राबवले जात आहेत. स्वच्छ शहर नामांकनामध्ये पहिल्या क्रमांकावर असलेल्या इंदौर शहराच्या धर्तीवर शहरातील ई-कचऱ्यासह लोखंड आणि प्लास्टिकपासून विविध कलाकृती आणि शिल्प निर्माण केले जाणार आहेत. या प्रकल्पाचे कामही पुन्हा एका खासगी संस्थेला देण्यात आले आहे.

महापालिकेने कनक या खासगी संस्थेला कचरा गोळा करण्याचे कंत्राट दिले असून शहरात रोज निघणारा १२०० टन कचरा भांडेवाडीतील डंपिंग यार्डमध्ये साठवला जातो. त्यात ओला व सुका कचऱ्यासह दररोज २०० टन प्लास्टिक आणि अडगळीत पडलेले लोखंड व इतर साहित्याचा समावेश असतो. ओला व सुका कचऱ्यासोबत भांडेवाडीत या निकामी साहित्याचे विलगीकरण केले जाते. त्याचा गेल्या काही वर्षांत काहीच उपयोग केला जात नव्हता. भांडेवाडीत हे साहित्य मोकळ्या जागेवर ठेवले जात असल्यामुळे आणि त्याकडे कोणाचे लक्ष नसल्यामुळे ते मोठय़ा प्रमाणात चोरीला जात होते. या कचऱ्याच्या योग्य उपयोग व्हावा, या उद्देशाने महापालिकेने इंदौरच्या धर्तीवर सर्व साहित्य भांडेवाडीत एका ठिकाणी गोळा करून कारखाना विभागाच्या माध्यमातून त्यांच्या वेगवेगळ्या कलाकृती आणि शिल्प तयार करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. याशिवाय शहरातील विविध झोनमध्ये आणि मुख्य कार्यालयात मोठय़ा प्रमाणात भंगार पडले आहे. त्याही वस्तू उपयोगात आणल्या जाणार आहेत. महापालिकेने २०१५ मध्ये तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या नेतृत्वात हा प्रकल्प हाती घेतला होता. त्यावेळी मोठय़ा प्रमाणात भंगार साहित्य गोळा करून वेगवेगळ्या शिल्पकृती तयार करण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी भंडारा व गोंदियामधून कारागिर बोलावण्यात आले होते. त्यावेळी करण्यात आलेल्या सर्व कलाकृती पुन्हा भंगारात गेल्या. प्रशासनाकडून  दुर्लक्षित झालेला हा प्रकल्प आता नव्याने राबवण्यात येणार असून त्यासाठी कारखाना विभागात जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या कलाकृती तयार झाल्यानंतर  विविध चौकांची शोभा वाढवणार आहेत.

झोनगणिक गोळा होणारा कचरा

’ लक्ष्मीनगर –    २२ टन

’ धरमपेठ –      ३५  टन

’ हनुमाननगर – १७  टन

’ धंतोली   –     १८ टन

’ नेहरूनगर –    २५ टन

’ गांधीबाग   –    ३६ टन

’ सतरंजीपुरा –  २२ टन

’ लकडगंज   –  ३५ टन

’ आशीनगर   –  २० टन

’ मंगळवारी  – ३० टन

इंदौरच्या धर्तीवर प्लास्टिक लोखंड आणि इतर ई-कचऱ्यापासून वेगवेगळ्या कलाकृती तयार करण्याचा प्रकल्प सुरू केला जात असून त्या दृष्टीने काम सुरू आहे. पाच वर्षांपूर्वी महापालिकेने हा प्रकल्प हाती घेतला होता आणि त्यावेळी काही मोजके शिल्प तयार केले होते. आता पुन्हा  शहराच्या सौंदर्यीकरणासाठी हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. त्याचे काम खासगी संस्थेला देण्यात आले आहे.

– डॉ. सुनील कांबळे, आरोग्य अधिकारी स्वच्छता

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2019 5:39 am

Web Title: various artworks and sculptures will be made from iron and plastic
Next Stories
1 अभाविप कार्यकर्त्यांचा विद्यापीठात धुडगूस
2 अकोला महापालिका करवाढीविरुद्ध अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर उच्च न्यायालयात
3 बिहारचे युवक नसते तर महाराष्ट्रातील कारखाने बंद झाले असते!
Just Now!
X