15 December 2017

News Flash

खासदारांचे वेतन ठरवण्यासाठी स्वतंत्र आयोग असावा

वेतन व भत्ते ठरविण्यासाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्यात यावा.

प्रतिनिधी, नागपूर | Updated: August 12, 2017 1:27 AM

वरुण गांधी

वरुण गांधी यांचे मत

खासदारांचे वेतन व भत्ते ठरविण्यासाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्यात यावा. संसदेत वेतन वाढविण्याचा अधिकार खासदारांना नसावा. वेतन हे संस्थेचे ठरवायचे असते, असे भाजपचे खासदार व परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या स्थायी समितीचे सदस्य वरुण गांधी म्हणाले. नागपुरात एका कार्यक्रमासाठी आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.

लोकशाहीच्या विकेंद्रीकरणाची आवश्यकता असल्याचे सांगून गांधी म्हणाले, सर्वसामान्य लोकांमध्ये प्रतिभा व काम करण्याचे साहस आहे, परंतु त्यांचा राजकीय क्षेत्रात प्रवेश दुरापास्त आहे. जोपर्यंत कुणाचा आशीर्वाद राहत नाही, तोपर्यंत तरुणांना राजकारणात पद मिळत नाही. ही स्थिती बदलण्याची आवश्यकता आहे. आजचा युवक समाजमाध्यमावर अधिक सक्रिय आहे. आज १६ कोटी लोक फेसबुकवर, तर २२ कोटी लोक व्हॉट्सअ‍ॅप वापरतात. या इलेक्ट्रॉनिक्स साधनांमुळे लोकांमध्ये जनजागृती शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे तरुणांना राजकारणात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राजकीय नेता आणि सर्वसामान्य जनतेतील दरी कमी झाली असून लोकहितांच्या कायद्यांमुळे तो राजकीय नेत्यांच्या जवळ पोहोचत आहे. यातून भविष्यातील राजकारणात युवकांचा सहभाग निश्चितपणे वाढेल, असेही त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना २६ कोटींची मदत

शेतकरी दुष्काळ व नापिकीला तोंड देत असताना आत्महत्येस प्रवृत होतो. त्याला आत्महत्यांपासून परावृत्त करण्यासाठी राज्य सरकारने कर्जमाफी देण्याकरिता संवेदनशील असावे, असे वरुण गांधी यांनी म्हणाले. उत्तर प्रदेशमध्ये कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी आपण स्वत: सव्वा कोटी रुपये दिले. त्यानंतर दानदात्यांकडून रक्कम जमा करून जवळपास ४ हजार शेतकऱ्यांना २६ कोटी रुपयांच्या निधीचे वाटप केल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये कुणीही मध्यस्थ नव्हता. आपण केवळ शेतकरी व दानदात्यांमध्ये समन्वय घडवून आणला होता, असेही ते म्हणाले.

First Published on August 12, 2017 1:27 am

Web Title: varun gandhi wants expert body to decide mp salary