19 October 2019

News Flash

दरवाढीमुळे भाज्या भोजनातून बाद

शहराच्या लगतच्या गावखेडय़ातून मोठय़ा प्रमाणात हिरवा भाजीपाला शहरात  येतो.

कोथिंबीर १०० रुपये तर मिरची पन्नास रुपये किलो

नागपूर : उन्हाळ्यात भाज्यांची आवक कमी होत असल्याने दर गगनाला भिडले आहेत. कोथिंबीर १०० रुपये किलो तर सिमला मिरची, हिरवी मिरची, कारले पन्नास ते साठ रुपये किलोने विकले जात आहेत. भाववाढीमुळे अनेकांच्या  भोजनातून भाज्या बाद झाल्या आहेत.

हिवाळा येताच मोठय़ा प्रमाणात भाज्यांची आवक वाढते. शहराच्या लगतच्या गावखेडय़ातून मोठय़ा प्रमाणात हिरवा भाजीपाला शहरात  येतो. मात्र, उन्हाळा सुरू होताच भाज्यांची आवक अचानक कमी होते. त्याचे मुख्य कारण म्हणजे शेतकऱ्यांना पुरेसे पाणी मिळत नाही. विहिरीवरच्या पाण्यावर त्यांना भाजीपाल्याची शेती करावी लागते. मात्र, यंदा विहिरींनी सुद्धा तळ गाठला आहे. त्याचा परिणाम उत्पादनावर झाला आहे. त्यामुळे आवक कमी झाली आहे. भाज्यांचे दर दुप्पट झाले आहेत. शिवाय सध्या लगीनसराई सुरू असल्याने भाज्यांची मागणी वाढली असल्याने बाजारात भाज्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे.

विदर्भात कोथिंबीर नाशिक, नांदेड आणि छिंदवाडा येथून येते. सध्या ती शंभर रुपये प्रतिकिलोने विकली जात आहे. तसेच सिमला मिरची टाटानगरवरून तर परवळ आणि तोंडली रायपूर येथून येत आहे. टमाटर संगमनेर तर कांदा नाशिक येथून येत आहे. पत्ताकोबी थोडय़ा प्रमाणात मुलताईवरून येत आहे. भेंडी जबलपूर येथून येत असल्याने या सर्व बाहेरगावाहून येणाऱ्या भाज्या पन्नास ते साठ रुपये किलो दराने ठोक बाजारात विकल्या जात आहेत.

भाज्यांचे दर          (प्रतिकिलो)

हिरवी मिरची         ५०-६० रु.

सिमला मिरची       ५०-६० रु.

कोिथबीर               १००-११० रु.

मेथी                      ३०-३५ रु.

चवळी शेंग             २५-३० रु.

भेंडी                       ३५-४० रु.

कारले                     ३५-४० रु.

गवार                     २५-३५ रु.

फूलकोबी               २५-४० रु.

पालक                   १०-१५ रु.

कोहळे                    १५-२० रु.

फणस                     ३०-३५ रु.

तोंडली                    ३०-४० रु.

गाजर                      २०-२५ रु.

काकडी                    २०-२५ रु.

मुळा                         २५-३० रु.

जिल्ह्य़ातून येणाऱ्या भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. परराज्यातून येणाऱ्या भाज्यांचे दर अधिक आहे. उन्हाळ्यात लग्न समारंभाचा हंगाम असतो. त्यामुळे भाज्यांची जास्त मागणी असते. ठोक बाजारात भाव वाढल्याने किरकोळ  बाजारात दर दुप्पटीने वाढले आहेत.

– राम महाजन, भाज्यांचे ठोक विक्रेते कॉटन मार्केट 

First Published on May 14, 2019 1:53 am

Web Title: vegetable price hike in nagpur market