मान्सून सुरू झाल्यावर पाऊस दडी मारून बसलेला असताना गेल्या काही दिवसात विदर्भात भाज्यांचे भाव कडाडले आहेत. त्यातच वारंवार होणाऱ्या डिझेल-पेट्रोल दरवाढीचा फटका भाज्यांनाही बसत आहे. नागपूरसह विदर्भात सर्व जिल्ह्य़ात सर्वच भाज्या ८० रुपये किलोच्या वर असल्यामुळे भाज्या विकत घेताना श्रीमंतांनाही खिशाकडे बघावे लागत आहे. चिल्लर बाजारातही महागाईने कहर केला असून त्याचा फटका सामान्य माणसाला बसत आहे.
शहरातील भाजीबाजारात एरवी २० ते ३० रुपये किलोप्रमाणे भाजी आता ८० ते १०० रुपये किलो भावाने विकली जात असल्यामुळे सामान्य माणूस त्रस्त झाला आहे. यावेळी नाशिक, मुंबईसह बाहेरून येणाऱ्या भाज्यांची आवक कमी आणि विदर्भातही भाज्यांचे उत्पादन कमी असल्यामुळे गेल्या काही दिवसात भाज्यांचे भाव वाढले आहे. सर्वसाधारण २० रुपये किलोप्रमाणे विकली जाणारी पानकोबी किरकोळ बाजारात ६० रुपये भावाने घ्यावी लागत आहे. सांबार ठोक बाजारातच ८० रुपये किलो झाला असून किरकोळ विक्रेते चक्क २५ रुपये पाव याप्रमाणे विकू लागले आहेत. टोमॅटो वधारले असून ८० रुपये किलो झाले आहेत. ढेमसे, चवळीच्या शेंगा, गवार, पालक, सिमला मिरची, या भाज्यांची चिल्लर विक्री ८० रुपये किलोप्रमाणे सुरू आहे, नागपुरात टोमॅटोची आवक संगमनेर आणि जयपूर येथून केली जाते, परंतु गेल्या काही दिवसांपासून टोमॅटो बाजारात येणेच बंद असल्याने तो ८० रुपये किलोवर पोहोचला आहे. पाऊस नसल्यामुळे एकीकडे शेतकरी चिंताग्रस्त असताना दुसरीकडे भाज्या कडाडल्यामुळे आता सामान्य माणूस त्रस्त झाला आहे. त्यामुळे कॉटन मार्केट आणि कळमना बाजारात गेल्या काही दिवसात भाज्यांची आवकच कमी झाली आहे. पाऊस पडल्यानंतर भाज्या आणखी महाग होण्याची शक्यता आहे, त्यामुळे येणाऱ्या दिवसात नागरिकांनी सर्वच भाज्या १०० रुपये किलोच्या वर जाण्याचे चिन्हे आहेत.
भेंडी- ८० रुपये, टोमॅटो ८० रुपये, चवळीच्या शेंगा ८० रुपये, गवार ६० रुपये, पालक ६० रुपये, दुधी ५० रुपये किलो, सिमला मिरची ८० रुपये, सांबार ८० रुपये, मिरची ८० रुपये, काकडी ६० रुपये, फुलकोबी, ६०, पत्ताकोबी ६०, वांगे ५०, कोहळे ४० रुपये, बटाटे ४०, लसूण १६० रुपये.