प्रत्येक भाजीमागे पाच ते दहा रुपयांची वाढ 

नागपूर : टाळेबंदीत शिथिलता मिळताच भाज्यांचे भाव कडाडले आहेत. विक्रेत्यांनी प्रत्येक भाजीमागे पाच ते दहा रुपयांची वाढ केली आहे.

शहरात पाच हजारहून अधिक ठोक व किरकोळ भाजी विक्रेते आहेत.  शंभरहून अधिक ठिकाणी छोटे मोठे बाजार भरतात, हातठेले उभे राहतात. टाळेबंदीमुळे नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीशिवाय घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली होती. जागोजागी पोलीस असल्याने नागरिक फळ, भाज्यांसाठी कळमना व कॉटन मार्केटमध्ये जाणे टाळत होते. त्याशिवाय गल्लोगल्ली भरणारा भाजीबाजारही बंद केला होता. अशात बाजारातील ग्राहकी कमी झाली आणि मागणीच्या तुलनेत भाज्यांची आवक वाढल्याने भाज्यांचे दर कोसळले होते. शिवाय हॉटेल व सार्वजनिक कार्यक्रम बंद असल्याने भाज्यांची उचल ७० टक्क्यांनी कमी झाली होती.

अशात हिरवा भाजीपाला १० रुपये किलोच्या आत होता. मात्र आता चौथ्या टाळेबंदीत अनेक ठिकाणी शिथिलता दिल्याने नागरिकांनी परत भाजीबाजारात गर्दी करणे सुरू केले आहे. त्यामुळे किरकोळ भाजी विक्रेते भाज्या स्वस्त असतानाही महाग विकत आहेत. सिमला मिरची १५ रुपये किलो, पालक जुडी १५  रुपये, मेथी २० रुपये, हिरवी मिरची ३० रुपये, सांबार ३० रुपये जुडी, बटाटा १५, कांदा १० रुपये किलो सोडता इतर भाज्या मात्र १० ते १२ रुपये प्रतिकिलोच्या घरात आहेत. मात्र किरकोळ भाजीविक्रेते बाजारात होणारी गर्दी व मिळालेली शिथिलता पाहता सर्व भाज्या महागात विकत आहेत.

कॉटन मार्केटमध्ये भाजी विक्रेत्यांचा बंद

महापालिकेने कॉटन मार्केट येथील ३२० गाळेधारकांसह भाजी विक्रेत्यांना दररोज दुकाने उघडण्याची परवानगी नाकारली असून त्यांना यादी प्रमाणे काही दिवसानंतर दुकाने सुरू करण्यास सांगितले आहे. ३२० गाळे धारकांपैकी केवळ ४० दुकाने दरदिवशी सुरू ठेवण्याचा महापालिकेचा निर्णय आहे. अशात येथील ९० ठोक भाजी विक्रेते अडचणीत आले आहे. त्यांना  रोज भाजी विकण्यास परवानगी नाही. अशात  शिल्लक राहिलेल्या भाजीचे करायचे काय, असा प्रश्न त्यांना पडला आहे. त्यामुळे या निर्णयाच्या विरोधात कॉटन मार्केट येथील भाजी विक्रेत्यांनी कॉटन मार्केट सुरू झाल्यावरही बुधवारी बंद पुकारला, असे ठोक विक्रेते राम महाजन यांनी सांगितले.