वर्धा मार्गावरील साई मंदिर परिसरातील वस्त्यांमधील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या घरापुढे होणाऱ्या साईभक्तांच्या वाहनगर्दीमुळे कंटाळले आहेत. विशेषत: गुरुवारी होणारी वाहनांची गर्दी त्यांना घराबाहेर पडण्यासही अडचणीची ठरली आहे.

वर्धा मार्गावरील छत्रपती चौकाजवळील साईमंदिर शहरातील अनेक प्रमुख श्रद्धांस्थळांपैकी एक आहे. दर गुरुवारी येथे हजारो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी गर्दी करतात. दिवसभर एखाद्या यात्रेसारखे स्वरूप मंदिर पसिराला प्राप्त होते. या  परिसरात वाहनतळासाठी जागा नाही. (व्यवस्थापनाकडून त्यासाठी जागेचा शोध सुरू आहे.) त्यामुळे भाविक त्यांची वाहने मंदिराच्या मागे असलेल्या वस्तीत जागा मिळेल त्या ठिकाणी उभी करतात. लोकांच्या घरापुढे दुचाकीच्या रांगाच रांगा लागलेल्या असतात. मुख्य रस्त्यांवरही (वर्धा मार्गावर) विवेकानंद नगर चौकापासून तर छत्रपती चौकापर्यंत दोन्ही बाजूंनी भक्तांची चार चाकी वाहने उभी असतात. मंदिराच्या बाजूला असलेल्या जोडरस्त्यावर फूल विक्रेते बसतात. त्यांच्या दुकानापुढे, त्या परिसरातील सर्वच छोटय़ा रस्त्यांवर दुचाकीची गर्दी पाहायला मिळते. घरापुढे ठेवण्यात येणाऱ्या दुचाकीमुळे लोकांना त्यांच्या घराचे फाटक सुद्धा उघडता येत नाही. वर्षांनुवर्ष हा प्रकार सुरू आहे. मंदिराच्या मागचा भाग हा दाट लोकवस्तीचा आहे. छोटी-मोठी दुकानेही आहेत. मुख्य रस्त्याला समांतर रस्ता असल्याने या भागात छोटय़ा वाहनांची कायम वर्दळ असते. गुरुवारी येथून जाण्यासाठी सुद्धा मार्ग शिल्लक राहात नाही. मंदिर व्यवस्थापनाने भक्तांच्या वाहनांसाठी बाजूची जागा मिळविण्याचा प्रयत्न केला होता. बाजूच्या  रस्त्यावरील अतिक्रमण काढून तेथे वाहनांसाठी जागा करता येईल का, याबाबतचाही विचार झाला होता. मात्र, नंतरच्या काळात त्याला यश येऊ शकले नाही.

नो-पार्किंच्या फलकाकडे दुर्लक्ष

मंदिराच्या मागच्या भागातील वस्त्यांमध्ये नागरिकांनी त्यांच्या घराच्या फाटकाला नो-पार्किंगचे फलक लावले आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून दर गुरुवारी साईभक्तांकडून वाहने उभी केली जातात. दिवसभर घरापुढचा भाग हा बंदिस्त होतो. आपल्याच घरातून आपल्याला बाहेर पडता येत नाही. गुरुवारी तर दिवसभर या वाहनांचा त्रास होतो. मुळातच रस्ते अरुंद आहेत. अशातच हा त्रास डोकेदुखी वाढविणारा आहे.अनेक वर्षांपासून या भागातील नागरिक नगरसेवक आणि संबंधित मंदिर प्रशासनाकडे या समस्येबाबत सांगत असूनही त्यावर अद्यापही तोडगा निघाला नाही. त्यामुळे अनेकांनी या भागातील घर विकून इतरत्र घेण्याचा विचार सुरू केला आहे.

दुचाकीची चोरी

मंदिराच्या बाहेर उभ्या केल्या जाणाऱ्या दुचाकींची चोरी होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत, असे या भागातील नागरिक सांगतात. गाडी ठेवून भक्त मंदिरात गेल्यावर त्याकडे लक्ष ठेवण्यासाठी कोणीही नसते. येथे वाहनांची गर्दी होत असल्याची बाब सर्वश्रुत आहे. त्यामुळे चोरटय़ांचे फावते. वाहने चोरीस जात असल्याच्या वृत्ताला परिसरातील फूलविक्रेतेही दुजोरा देतात.

मुलांची अडचण

घरापुढील वाहनगर्दीमुळे या भागातील मुलांना खेळता येत नाही. पालकांनाही त्यांच्या मुलांना बाहेर जाऊ देण्याबाबत दहा वेळा विचार करावा लागतो. रात्री घरात ठेवलेले वाहन सकाळी बाहेर काढायचे म्हटले तर जागाच उरत नाही, असे या भागात राहणाऱ्या महिलांनी सांगितले.