काँग्रेसची अतिशय वाईट कामगिरी

नागपूर : काँग्रेसने बिहार विधानसभा निवडणूक आणि मध्यप्रदेशातील पोटनिवडणुकीत पक्षाचे सरचिटणीस अविनाश पांडे आणि राज्याचे मंत्री सुनील केदार यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवली होती. या दोन्ही राज्यात काँग्रेसच्या अतिशय वाईट कामगिरीने या नेत्यांच्या व्यूहरचनेचा ‘फियास्को’ झाला आहे.

बिहारमध्ये काँग्रेसने ७० जागा लढवल्या. यापैकी केवळ १९ जागा जिंकल्या तर मध्यप्रदेश पोटनिवडणुकीत २८ जागांपैकी केवळ ९ जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसच्या ताब्यातील अनेक जागांवर भाजपने भगवा फडकावला.

नागपूरचे अविनाश पांडे यांच्याकडे काँग्रेस पक्षाने  बिहार निवडणुकीसाठी उमेदवार निवड समितीचे अध्यक्षपद दिले होते. काँग्रेसला बिहारमध्ये केवळ ९.४८ टक्केमत प्राप्त झाले. या निवडणुकीत सर्वात वाईट कामगिरी काँग्रेसची आहे. राजस्थानध्ये काँग्रेसचे प्रभारी असताना पांडे यांना अशोक गहलोत यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन करण्यात यश आले होते. परंतु अशोक गहलोत आणि सचिन पायलटयांच्यातील सत्तासंघर्ष योग्य प्रकारे हाताळण्यात ते अपयशी ठरल्याचा ठपका ठेवून पक्ष नेतृत्वाने त्यांची उचलबांगडी केली गेली. नंतर त्यांना बिहारमध्ये उमेदवार निवडीची जबाबदारी दिली. त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

काँग्रेस उमेदवार विजयी होण्याचे प्रमाण आणि मिळालेल्या मतांची टक्केवारी बघता उमेदवारी वाटपातील चुकांचा मोठा वाटा असल्याचे दिसून येत आहे.

मध्यप्रदेशातील पोटनिवडणुकीत देखील काँग्रेसला चांगली कामगिरी करता आली नाही. मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी महाराष्ट्र सरकारमधील मंत्री सुनील केदार यांना महत्त्वाच्या ग्वालियर आणि मुरैना या दोन जिल्ह्यांच्या भार सोपवला होता. काँग्रेसला सरकारमध्ये परत येण्यासाठी ही पोटनिवडणूक अत्यंत महत्त्वाची होती. परंतु या जिल्ह्य़ात काँग्रेसमधून भाजपात गेलेले ज्योतिरादित्य सिंधिया यांनी त्यांचे प्राबल्य पुन्हा सिद्ध केल्याने केदार यांचे डावपेच येथे चालू शकले नाहीत.

बिहार निवडणुकीमध्ये अनेक युती आणि आघाडय़ा झाल्या होत्या. तरी काँग्रेस आणि राजदच्या महाआघाडीने मुद्याच्या आधारावर चांगली लढत दिली. अपेक्षित यश मिळाले नाही. परंतु जातीयवाद, सांप्रदायिक आणि द्वेषावर आधारलेल्या  निवडणुकीला त्यातून बाहेर काढण्यात यश आले. सामाजिक न्यायाच्या मुद्यांकडे निवडणुकीला वळवता आले.

अतुल लोंढे, प्रवक्ता,  काँग्रेस

विरोधी पक्ष देशभरात आमच्यावी टीका करीत होता. त्याला बिहारमध्ये चोख प्रतिउत्तर मिळाले. शिवसेनेच्या देशभर चाललेल्या नौटंकीला जनतेने उत्तर दिले आहे. त्यांच्या जवळपास सर्वच उमेदवारांची जमानत जप्त झाली आहे. शिवसेनेने चादर पाहूनच पाय पसरायला पाहिजे होते. यातून त्यांना निश्चित धडा मिळेल.

– गिरीश व्यास, प्रवक्ता,भाजप.