शेतकऱ्यांना कर्जमाफी हवी, या मागणीवरून सभागृहाचे कामकाज बंद पाडणाऱ्या बहुतेक आमदारांना ‘स्वामिनाथन आयोग’ काय आहे, हेच ठाऊक नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा सुचविण्यासाठी नेमलेल्या या आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, असा ठराव विधिमंडळात मंजूर करा, अशी मागणी घेऊन आमदारांना भेटलेल्या ‘भूमिपुत्र संघर्ष वाहिनी’च्या शिष्टमंडळाला हा धक्कादायक अनुभव आला.

शेतकऱ्यांच्या हितासाठी स्वामिनाथन आयोगाने केलेल्या अनेक शिफारशी केंद्राने तात्काळ स्वीकाराव्यात, असा ठराव पंजाब विधानसभेने नुकताच एकमताने मंजूर केला आहे. असाच ठराव महाराष्ट्र विधानसभेनेसुद्धा मंजूर करावा, या मागणीसाठी पुण्यातील ‘भूमिपुत्र संघर्ष वाहिनी’च्या पदाधिकाऱ्यांनी गेल्या चार दिवसांपासून नागपूर येथे आमदारांच्या भेटी घेणे सुरू केले आहे. शेतकरी कुटुंबातून आलेल्या व सध्या सॉफ्टवेअर अभियंते म्हणून काम करणाऱ्या काही तरुणांनी ही वाहिनी स्थापन केली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रण माजविणाऱ्या आमदारांच्या भेटी घेताना या तरुणांना हा विसंगत अनुभव आला.
या वाहिनीचे शिष्टमंडळ गेल्या चार दिवसांत ८९ आमदारांना भेटले. त्यापैकी ७५ आमदारांना स्वामिनाथन आयोग काय व त्याच्या शिफारशी काय, हेच ठाऊक नव्हते. यातील बहुतांश आमदारांनी हा आयोग काय ते समजावून सांगा, अशी विनंती या शिष्टमंडळालाच केली. काहींनी मात्र काहीही ऐकून घ्यायलाच नकार दिला. एका आमदाराने तर स्वामिनाथन आयोगाचा रामदास स्वामींशी काही संबंध आहे का, असा प्रश्न विचारून कडी केली.