News Flash

‘रामायणातील स्त्रिया’ची अतिशय वस्तुनिष्ठ  मांडणी

रामायणातील व्यक्तिरेखा वेगवेगळ्या पद्धतीने लेखनातून मांडण्यात आल्या.

‘रामायणातील स्त्रिया’ची अतिशय वस्तुनिष्ठ  मांडणी

ज्येष्ठ विचारवंत मधुकर भावे यांचे प्रतिपादन; स्मिता स्मृती विशेषांकाचे प्रकाशन

नागपूर : रामायणातील व्यक्तिरेखा वेगवेगळ्या पद्धतीने लेखनातून मांडण्यात आल्या. त्यावर चर्चा व समीक्षणात्मक लेखन झाले आहे. मात्र  रामायणातील स्त्रियांची  ‘रामायणातील स्त्रिया’ या पुस्तकात अतिशय वस्तुनिष्ठ  मांडणी करण्यात आली. बहुदा हे रामायणावर असे पहिलेच पुस्तक असले पाहिजे, असे मत ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक मधुकर भावे यांनी व्यक्त केले.

रत्ना कम्युनिकेशनच्यावतीने ‘रामायणातील स्त्रिया’  या विषयावर आधारित स्मिता स्मृती विशेषांक प्रकाशन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या पुस्तकात ज्यांनी  लेखन केले आहे अशा लेखिकांचा मधुकर भावे व माजी शिक्षणमंत्री वसंतराव पुरके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शोभा गांधी, ज्येष्ठ समाजसेवक व वनराईचे अध्यक्ष गिरीश गांधी उपस्थित होते. राष्ट्रभाषा संकुलाच्या बाबुराव धनवटे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात अभ्यासपूर्ण लेखन करणाऱ्या लेखिका डॉ. लीना रस्तोगी, डॉ. प्रज्ञा आपटे, डॉ. प्रतिमा इंगोले, डॉ. कविता होले, डॉ. नंदा पुरी, डॉ. भारती सुदामे, डॉ. रत्नाप्रभा अंजनगावकर, डॉ. आशा आंबोरे, आशा पांडे, शुभांगी भडभडे, प्रतिभा कुळकर्णी, डॉ. स्मिता होटे, डॉ. मुदुला नासेरी, डॉ. पद्मरेखा धनकर, नम्रता गांधी यांच्यासह अ‍ॅड. स्मिता सिंगलकर, मंजूषा पंडित आणि विभा गांधी यांचा स्मृतिचिन्ह व साडी देऊन सत्कार करण्यात आला.

रामायणातील स्त्री व्यक्तिरेखावर लिहिणे सोपे नाही. मात्र या ग्रंथात प्रत्येक व्यक्तिरेखेची केलेली मांडणी ही अभ्यासपूर्ण आहे. सीतेशिवाय राम अपुरा आहे. सीतेमध्ये सोशिकता, नम्रता होती मात्र तिच्यावर अन्याय झाला आहे. आजच्या काळात स्त्रियावर अन्याय झाले की चर्चा होत असते, मात्र त्या काळात अशा चर्चा नव्हत्या. त्यामुळे निमूटपणे स्त्रिया सहन करत होत्या. या पुस्तकातील प्रत्येक व्यक्तिरेखेला लेखिकांनी न्याय दिला आहे, असेही भावे म्हणाले.

यावेळी वसंतराव पुरके यांनी रामायणातील स्त्रियांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकत हे पुस्तक  अभ्यासपूर्ण असल्याचे सांगितले. रामायण-महाभारतातील या व्यक्तिरेखांवर मूल्यात्मक स्वतंत्रपणे विचार करून लेखन केले पाहिजे आणि त्यातून मानवी मूल्याची पेरणी केली पाहिजे, असेही पुरके  म्हणाले. यावेळी डॉ. शोभा गांधी यांचे भाषण झाले.  प्रास्ताविक गिरीश गांधी यांनी तर संचालन रेखा दंडिगे-घिया यांनी केले.

पक्षांतराची परंपरा रामायण काळापासून

गेल्या काही वर्षांत राजकीय क्षेत्रात पक्षांतर करण्याची परंपरा सुरू असली तरी ती आताची नाही तर रामायणापासून सुरू झाली आहे. रावणाचा भाऊ विभिषण हा  प्रभू रामचंद्राकडे आला आणि रावणाचा वध केल्यानंतर विभिषणाला राज्याचा कारभार दिला आहे. त्यामुळे पक्ष बदलण्याची परंपरा ही  रामायणापासून सुरू झाल्याचे भावे म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2021 1:06 am

Web Title: very objective layout women ramayana ssh 93
Next Stories
1 सलग तिसऱ्या दिवशी लसीकरण बंद
2 करोना काळातील वैद्यकीय साहित्य खरेदीची चौकशी
3 नागपूर विभागात विशेषज्ज्ञ डॉक्टरांची ५२ टक्के पदे रिक्त!
Just Now!
X