आयुक्तांची भेट घेणार, महापालिकेने १६ स्थळे हटवली

नागपूर : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शहरातील विविध भागातील अतिक्रमित अनधिकृत धार्मिक स्थळे पाडण्याच्या मनपाच्या कारवाईविरोधात आता विश्व हिंदू संघटनेने बिगूल फुंकला आहे. यासंदर्भात विहिंपचे पदाधिकारी आयुक्तांची भेट घेणार आहेत.

दुसऱ्या दिवशी मंगळवारी नागपूर सुधार प्रन्यास व महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने १६ धार्मिक स्थळे पाडली. दरम्यान, काही भागात पुरातन मंदिर पाडण्याला विरोध केला मात्र पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये कारवाई पार पाडली. आतापर्यंत नासुप्र व महापालिकेने ५४० धर्मिक स्थळे पाडली असताना ऐन श्रावण महिना तोंडावर असताना ही कारवाई पुन्हा सुरू केली. दरम्यान, विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे काही कार्यकर्ते आयुक्तांची भेट घेणार आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी पुन्हा एकदा धार्मिक संस्था वाद निर्माण होण्याची चिन्हे आहे.

लोकसभा निवडणुकीच्या काळात थांबवण्यात आलेली धार्मिक अवैध स्थळांवरील कारवाई न्यायालयाच्या आदेशानंतर  सोमवारपासून पुन्हा सुरू झाली आहे. सोमवारी सहा मंदिरावर कारवाई केल्यानंतर गुरुपौर्णिमेच्या दिवशी नागपूर सुधार प्रन्यास आणि महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने कारवाईचा धडाका सुरू ठेवला. भांडेवाडीतील समतानगर भागात धार्मिक स्थळ हटवत असताना परिसरातील नागरिकांनी विरोध केला. मंदिरासमोर ठिय्या आंदोलन केले मात्र पोलिसांच्या बंदोबस्तानंतर ही कारवाई पार पडली.

नासुप्रने विविध धर्माच्या १२ स्थळांवर कारवाई केली. भांडेवाडी परिसरातील १० तर पारडी भागातील ६ धार्मिक स्थळे कारवाईतून सुटली नाहीत. पारडी भागात काही युवकांनी बुलडोझर परिसरात येऊ दिले नाही. मात्र, पोलिसांनी युवकांना पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर युवकांचा विरोध मावळला आणि कारवाई पूर्ण झाली.

कारवाईच्या दुसऱ्या टप्प्यात मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने धरमपेठ झोनअंतर्गत आयबीएम रोड दीपक नगर, तीन मुंडी चौक, सदर आणि व्हीसीए मैदानाच्या शेजारी असलेल्या धार्मिक स्थळावर कारवाई केली.

मजुरांचा विरोध झुगारला

भांडेवाडी परिसरातील समतानगर येथील मोकळ्या भूखंडावर मोलमजुरी करणाऱ्या मंजुरांनी पैसे गोळा करून दोन वर्षांपूर्वी बांधले होते. या स्थळाला दोनवेळा नोटीस दिल्या होत्या मात्र त्या भागातील काही राजकीय नेत्यांच्या दबावामुळे कारवाई होत नव्हती. मंगळवारीसुद्धा तेथील कामगारांनी विरोध केला, परंतु पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये स्थळावर कारवाई करण्यात आली.