हिंगणघाट जळीत प्रकरणातील पीडितेची प्रकृती शनिवारी खालावली. तिला कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आले असून ती उपचारांना प्रतिसाद देत असल्याचे ऑरेंज सिटी रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. गरज पडली तर तिला विशेष विमानाने मुंबईत हलवण्याची शक्यताही पडताळून पाहिली जात आहे.

पीडितेला आज प्रथमच पोषण नलिकेतून द्रवरूप आहार देण्यात आला. त्याला ती सकारात्मक प्रतिसाद देत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. पीडितेच्या शरीरातील ऑक्सिजनची मात्रा शुक्रवारी रात्री कमी झाली होती. ती वाढवण्यासाठी डॉक्टरांनी मध्यरात्री तिला कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवले.

पीडितेच्या शरीरात संसर्ग वाढल्यामुळे डॉक्टरांनी प्रतिजैविकांची मात्रा वाढवली. त्यामुळे संसर्ग नियंत्रणात आहे. तिची प्रकृती नाजूक असल्याने शनिवारी मलमपट्टी करण्यात आली नाही. ही तरुणी शुद्धीवर असून प्रतिसाद देत आहे.

दरम्यान, शनिवारी सकाळी पशुसंवर्धन आणि क्रीडामंत्री सुनील केदार यांनी रुग्णालयात तिच्या कुटुंबीयांची भेट घेतली. सध्या पीडिता जंतुसंसर्गाशी झुंज देत आहे. येथील जंतुसंसर्गतज्ज्ञ डॉ. अश्विनी तायडे, अतिदक्षता विभागातील तज्ज्ञ डॉ. राजेश अटल, बर्न स्पेशालिस्ट डॉ. अनिल केसवानी, डॉ. नुरुल अमिन तिच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.

प्रथमच डोळे उघडले..

आज तिने प्रथमच पूर्ण डोळे उघडल्याचे डॉक्टरांनी सांगितले. नेत्ररोग तज्ज्ञांच्या प्राथमिक तपासणीत तिची दृष्टी कायम असल्याचे आढळले. परंतु पुढच्या तपासणीतून तिच्या दृष्टीबाबत ठोस निष्कर्ष काढता येईल, असे डॉ. नुरुल अमिन यांनी सांगितले.