विदर्भ हा पारंपरिकदृष्टय़ा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. अगदी आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीतही विदर्भाने काँग्रेसला साथ दिली होती. पण गेल्या तीन वर्षांत विदर्भात काँग्रेसचा जनाधार घटला असून, पक्षाची पीछेहाट होत असताना नेतेमंडळींमधील भांडणे कमी झालेली नाहीत. दुसरीकडे केलेल्या कामांची योग्य व प्रभावी जाहिरात करण्यात भाजपला यश आले व त्याचा त्यांना राजकीय लाभही झाला. म्हणूनच विदर्भ बरोबर काँग्रेस हे समीकरण बदलून विदर्भ बरोबर भाजप हे नवे समीकरण तयार झाले.

काँग्रेसच्या राजवटीत सरकारची सक्रियता विदर्भात एवढी कधीच नव्हती. हा बदल जनतेला दिसू लागला व त्याचा फायदा प्रत्येक निवडणुकीत भाजपला मिळू लागला. फडणवीस यांनी नागपूर व अमरावती या दोन्ही ठिकाणांवर एकाच वेळी लक्ष केंद्रित केले. त्यामुळे नागपूरला भरपूर मिळते, अमरावतीला नाही ही प्रारंभी निर्माण झालेली भावना नंतर दूर झाली.

शिवसेनेला धक्का

प्रामुख्याने पश्चिम विदर्भात भाजप वाढवतानाच तेथे प्रभुत्व असलेल्या सेनेचे खच्चीकरण करायचे अशी सत्ताधाऱ्यांची रणनीती होती, त्यात त्यांना यश आले. अपवाद फक्त यवतमाळ राहिला. तेथे सेनेचे संजय राठोड यांनी भाजपला टक्कर दिली. गडचिरोलीच्या बाबतीतही भाजपचे गणित चुकले. मंत्री केल्यावरसुद्धा रोज दुपारी १२ वाजता झोपेतून उठणाऱ्या अहेरीच्या राजामुळे या जिल्ह्य़ात भाजपला सत्ता मिळू शकली नाही. आता या राजाची गच्छंती अटळ मानली जात आहे. याशिवाय सूरजागडचे प्रकरण सरकारला नीट हाताळता आले नाही. अमरावतीच्या ग्रामीण भागात भाजपकडे दमदार नेतृत्वच नाही याचाही प्रत्यय या निकालाने आणून दिला. प्रत्येक जिल्ह्य़ात संपर्कावर भर देणाऱ्या भाजपने या अडीच वर्षांच्या काळात अनेक आश्वासनांपासून पाठ फिरवली. स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा थंडय़ा बस्त्यात टाकला. शेतकऱ्यांना हमीभावावर बोनस देऊ, हे आश्वासन पाळले नाही. प्रारंभीची दोन वर्षे मोठा गाजावाजा करण्यात आलेली जलयुक्त शिवारची योजना गेल्या सहा महिन्यांत संथ झाली. शेतकरी आत्महत्या थांबवू हे आश्वासनसुद्धा हवेत विरले. या अपयशाकडे सामान्य जनतेने दुर्लक्ष करून भाजपला साथ का दिली, या प्रश्नाचे उत्तर सत्ताधाऱ्यांचे प्रभावी प्रचारतंत्र व विरोधकांचे अपयश या दोन मुद्दय़ात सामावले आहे. केवळ निवडणुकीच्या काळातच नाही तर गेल्या अडीच वर्षांत भाजपचे प्रचारतंत्र व संपर्क यंत्रणा अतिशय प्रभावी होती. याउलट काँग्रेसच्या वर्तुळात या काळात कमालीची शांतताच राहिली. निवडणूक आली की दणकून भांडायचे, एकमेकांचे पाय ओढायचे हे काम या पक्षाच्या नेत्यांनी या अडीच वर्षांत अतिशय निष्ठेने केले.

काँग्रेसकडे नव्या नेतृत्वाचा अभाव

बराच काळ सत्ता भोगून काँग्रेसचे नेते एवढे गब्बर झाले आहेत की सत्ता असली आणि नसली तरी त्यांच्या दैनंदिन व्यवहारात काहीच फरक पडत नाही. त्यामुळे पराभव झाला तरी चालेल, पण पक्षातील गादी सोडायची नाही याकडेच त्यांचा कल असतो. यात खरी हानी होते ती कार्यकर्त्यांची, पण त्याचे सोयरसुतक या नेत्यांना आधीही नव्हते व आताही नाही. नेत्यांच्या या दरबारी राजकारणाच्या सवयीमुळे हा पक्ष विरोधकाच्या भूमिकेत अजून शिरू शकला नाही. त्याचे दर्शन ग्रामीण भागात व नागपुरात या निवडणुकीच्या काळात झाले. या अडीच वर्षांच्या काळात नेहमी काँग्रेससोबत राहणारा ओबीसीचा वर्ग भाजपने आपल्याकडे खेचला. या ओबीसीचे नेतृत्व करणारा एकही नवा नेता या पक्षाकडे नाही. नवे नेतृत्व तयार होऊ द्यायचेच नाही, असा चंग या पक्षातल्या जुन्या नेत्यांनी बांधला आहे. प्रत्येक निवडणुकीत पाडापाडीचे राजकारण होते तेव्हा हेच दिसून येते. या वेळीही ते ठिकठिकाणी दिसले. याउलट सत्ता येताच भाजपच्या नेत्यांनी आपसातले मतभेद जाहीरपणे समोर येऊ दिले नाहीत. फडणवीस व गडकरी यांनी मतभेदाच्या मुद्दय़ावर कमालीचे सामंजस्य दाखवले. या एकसंधतेचा फायदा भाजपला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती आधीही विदर्भात चांगली नव्हती. आता या निकालाने तर ती दारुण करून टाकली आहे. बसप व ओवेसीच्या पक्षांनी चांगले अस्तित्व दाखवत काँग्रेसला धोक्याचा इशारा देण्याचे काम या निकालातून केले आहे.

  1. विदर्भातील बहुतांश शहरात सत्ता मिळवल्यानंतर जिल्हा परिषदांच्या निमित्ताने भाजपने ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित केले होते. त्यात या पक्षाला नेत्रदीपक यश मिळू शकले नसले तरी अनेक ठिकाणी या पक्षाने उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
  2. बुलढाणा व यवतमाळ ही त्यातील ठळक उदाहरणे आहेत. या दोन्ही जिल्ह्य़ांच्या ग्रामीण भागातून काँग्रेस प्रथमच हद्दपार झाली आहे. राज्यात युतीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दर आठवडय़ाला विदर्भाचा दौरा केला.
  3. केवळ फडणवीसच नाही तर गडकरी, सुधीर मुनगंटीवार, हंसराज अहीर, चंद्रशेखर बावनकुळे यांनीही प्रत्येक जिल्ह्य़ात जाण्याचे सातत्य राखले. या अडीच वर्षांत अनेक रस्ते राष्ट्रीय महामार्गात बदलण्यात आले. जिल्हा नियोजन व विकास परिषदेच्या निधीत दुपटीने वाढ झाली. त्यामुळे अनेक कामांना गती आली.