देवेंद्र गावंडे

पराभवातून माणसे धडा शिकतात असे म्हणतात. मात्र, राजकारणात असे घडेलच याची खात्री देता येत नाही. या क्षेत्रात सततचा पराभव सुद्धा नेत्यांच्या डोळ्यावरची पट्टी जशीच्या तशी ठेवतो. अशी अनेक उदाहरणे आहेत. गेल्या चार वर्षांतील विदर्भातील काँग्रेसच्या नेत्यांचे वर्तन बघितले की या वाक्यांची आठवण होते. एकेकाळी काँग्रेसचा गड असलेला हा प्रदेश पूर्णपणे भाजपच्या ताब्यात गेल्याचे चार वर्षांपूर्वी स्पष्ट झाले. हा गड पुन्हा जिंकण्यासाठी काँग्रेसचे नेते किमान पराभवाच्या धक्क्यातून सावरल्यावर तरी जीवाचे रान करतील अशी अपेक्षा अनेकांना होती. विशेषत: या पक्षातील सामान्य कार्यकर्ते त्यासाठी आस लावून बसले होते. वास्तवात नेत्यांनी या साऱ्यांची निराशा केली असे आज म्हणावे लागते. आता निवडणुका एक वर्षांवर येऊन ठेपल्या आहेत. सत्ताधारी भाजपची निवडणूक तयारी केव्हाच सुरू झाली आहे. काँग्रेसमध्ये मात्र अजूनही शांतता आहे. या पक्षातील जुने व विश्वासार्हता गमावून बसलेले नेते पक्षात कसे सक्रिय राहता येईल, यासाठी शिंदेसारख्या नेत्यांना भेटण्यात व्यस्त आहेत. काहीही करून पक्षात राहायचे, उमेदवारीसाठी प्रयत्न करायचा व ती मिळाली नाही तर भाजपला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचे, हा या नेत्यांचा एककलमी अजेंडा आहे. भाजपने केलेल्या चुका जनतेसमोर आणणे, सामाजिक सौहार्दाचे बिघडत चाललेले वातावरण चांगले कसे करता येईल यासाठी प्रयत्न करणे, समाजातील सद्भावनेचा धागा बळकट करणे, पक्षाच्या विचारधारेच्या मागे जनमत कसे आणता येईल, यासाठी प्रयत्न करणे यासारखे पक्षाला अपेक्षित असलेले एकही काम या नेत्यांना करायचे नाही. फक्त स्वत:चा, कुटुंबाचा व पक्षामुळे मिळालेल्या जहागिरीचा विचार करणारी ही मंडळी आहे. अशा नेत्यांच्या बळावर काँग्रेस येत्या काळात यश मिळवेल असे म्हणणे आज तरी धाडसाचे आहे. गेल्या चार वर्षांतील प्रत्येक निवडणुकीत पराभव होऊन सुद्धा हे नेते आतातरी एकत्र येण्याचा, मतभेद बाजूला ठेवण्याचा विचार करू शकत नसतील तर या नेत्यांच्या तसेच ते ज्या पक्षात आहेत, त्या काँग्रेसच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह उभे ठाकते. का म्हणून यांच्या मागे जावे, असा विचार सामान्य माणूसही करू लागतो. राजकारणातील या मूलभूत गोष्टी या नेत्यांना कळत नाहीत असेही नाही. तरीही ते असे का वागतात, याचे उत्तर या नेत्यांनी बाळगलेल्या गंडात दडले आहे. जनाधार गेला तरी हा गंड कायम आहे. सततच्या पराभावानेही तो जाईल, याची शाश्वती नाही कारण या गंडाला आर्थिक संपन्नतेची किनार आहे. यातून येणारा अहं फार मोठा असतो. म्हणूनच हे नेते भाजपला लोक कंटाळतील व एक दिवस गुमान आमच्या मागे येतील असे सहजपणे म्हणू शकतात. नेत्यांच्या या अहंगंडाची सामान्यांना चीड आहे. म्हणूनच गेल्यावेळचा पराभव झाला. तरीही त्यातून बोध घ्यायला या पक्षाचे नेते तयार नाहीत. भंडारा-गोंदियात नुकताच भाजपचा पराभव झाला. नाना पटोले नावाच्या जिद्दी नेत्याला चाणाक्ष प्रफुल्ल पटेलांची साथ मिळाली व सारी समीकरणे जुळून आली. या विजयामुळे नाना व भाई जेवढे आनंदित झाले नसतील, तेवढे हे पडीक नेते आनंदले आहेत. गेली चार वर्षे शांतपणे बसलेल्या या नेत्यांना आता स्फुरण चढायला सुरुवात झाली आहे. जनतेत सत्तेविषयी असंतोष आहे, याची जाणीव या निकालाने करून दिली. अशा स्थितीत पक्षाने संधी दिली तर आपल्यालाही फायदा होऊ शकतो, असा स्वार्थी विचार या आनंदामागे आहे. म्हणूनच या सर्वाना शिंदेंची भेट घ्यावीशी वाटते. भंडाराच्या विजयाआधी विदर्भात काँग्रेसला जिव्हारी लागतील अशा दोन घटना घडल्या. विधान परिषदेच्या निवडणुकीत दोन जागा या पक्षाला गमवाव्या लागल्या. अमरावतीत या पक्षाची शंभर मते ठोकच्या भावात विकली गेली. ज्यांनी पैसे खाऊन पक्षाशी गद्दारी केली तेच दुसऱ्या दिवशी पक्षाने आयोजित केलेल्या पेट्रोल भाववाढीविरुद्धच्या आंदोलनात मोठय़ा आनंदाने सहभागी झाले. सरडय़ापेक्षा वेगाने रंग बदलण्याचा हा पराक्रम साऱ्या वऱ्हाडाने बघितला. या अशा दुहेरी निष्ठांमुळेच या भागात पक्ष रसातळाला पोहोचला हे वास्तव आहे. असाच प्रकार चंद्रपूर-वध्र्यात घडला. येथे पक्षाच्या एका गटाने भाजपच्या नाकात दम आणला. आता सरशी होईल, पक्षाचा उमेदवार निवडून येईल, असे लक्षात येताच दुसरा गट सक्रिय झाला. त्याने आतून भाजपशी संधान साधले. सर्वकाही ठरल्यावर पक्षाच्याच उमेदवाराला गंडवण्यात आले. त्यासाठी तब्बल ३१ मते अवैध ठरण्याची खेळी खेळण्यात आली. नंतरच्या दोनच दिवसात काही घडलेच नाही अशा थाटात हे नेते पक्षाच्या व्यासपीठावर पुन्हा सक्रिय झाले. विद्यमान पदाधिकारी आमच्याकडे लक्ष देत नाही, अशा तक्रारी करू लागले. पक्षासाठी किती खस्ता खाल्ल्या याची जाणीव केंद्रीय नेतृत्वाला करून देऊ लागले. पक्ष खड्डय़ात गेला तरी चालेल, पण पक्षांतर्गत विरोधकाचे पाय ओढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी जणू प्रतिज्ञाच या पक्षातील बहुसंख्य नेत्यांनी केलेली आहे. गेली अनेक वर्षे हेच सुरू आहे. दोन दशकापूर्वी विदर्भात भाजपची शक्ती अतिशय क्षीण होती. ती वाढवण्याला हातभार लावला तो काँग्रेसमधील असंतुष्टांनी. कोणत्याही जिल्ह्य़ाचा निवडणूक इतिहास तपासला तर हेच समोर येईल. या असंतुष्टांना गोंजारत, शिवसेनेच्या पाठीवर हात ठेवत भाजप वाढला व आज विदर्भातील सर्वात मोठा पक्ष झाला. या काळात भाजपमध्ये सुद्धा भांडणे झाली, असंतुष्ट तयार झाले. या पक्षाला अनेकदा पराभव स्वीकारावा लागला, पण या पक्षाच्या नेत्यांनी कधीही घाऊकपणे काँग्रेसला निवडून देण्यासाठी मदत केली नाही. पक्षांतर्गत भांडणाचा लाभ विरोधकाला मिळेल असे वर्तन कधी केले नाही. हा इतिहास ठाऊक असून सुद्धा काँग्रेसचे असंतुष्ट आज प्रतिकूल स्थितीतही स्वपक्षीयांची जिरवण्यासाठी विरोधकांना मदत करतात तेव्हा विदर्भात काँग्रेसचे भवितव्य काय, असा प्रश्न उपस्थित होतो. चार वर्षांपूर्वी लोक काँग्रेसवर नाराज होते, आता भाजपवर आहेत या विचाराने निवडणुकीत यश मिळवता येते, पण ते तात्कालिक असते. जनतेच्या मनात कायमचा विश्वास निर्माण करायचा असेल तर नेत्यांचे वर्तनही प्रामाणिक असायला हवे. तो प्रामाणिकपणा काँग्रेस नेत्यांमध्ये नावालाही शिल्लक उरलेला नाही हेच या ताज्या घडामोडीतून दिसून येते. राजकारण, सत्ताकारण हे जनतेच्या भल्यासाठी असणे ही गोष्ट कधीचीच इतिहासजमा झाली याचे दर्शन वारंवार घडवणाऱ्या या नेत्यांचे खरे तर आभार मानायला हवेत!

devendra.gawande@expressindia.com