एरवी वेगळ्या विदर्भासाठी सभागृहाच्या आत आणि बाहेर आक्रोश करणाऱ्या आमदारांनी विदर्भाच्या मुद्दय़ावरील चर्चेला अनुपस्थिती दर्शवल्याने अजित पवारांनी हरकत घेतली. त्यामुळे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सभा १५ मिनिटांसाठी तहकूब केली.
यापूर्वी गणपूर्ती न झाल्याने, संबंधित खात्याचे मंत्री अनुपस्थित असल्याने, अणे आणि मुस्लिम आरक्षणाच्या मुद्दय़ावर गोंधळ घातल्याने अध्यक्षांनी दहा किंवा पंधरा मिनिटे सभा तहकूब केली आहे. शुक्रवारी नियम २९३चा प्रस्ताव अजित पवार सादर करणार होते. मात्र, विदर्भातील आमदार सभागृहात नसल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी अध्यक्षांचे लक्ष त्याकडे वेधले. विदर्भातील महत्त्वाच्या समस्यांवरच विदर्भातील आमदार गैरहजर असल्याने काय विदर्भाला न्याय देणार, असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला.
संबंधित प्रस्तावात विदर्भ व मराठवाडय़ात खनिज व जंगल संपत्ती मोठय़ा प्रमाणात असूनही जनतेला त्याचा फायदा न मिळणे, विदर्भ व मराठवाडय़ात ग्रामीण भाग मोठय़ा प्रमाणात असूनही या दोन्ही भागात विकासासोबतच आरोग्य विषयक सुधारणा करण्याची नितांत आवश्यकता, विदर्भात विशेषत: अमरावती व मेळघाट येथे कुपोषणामुळे बालकांचे होणारे मृत्यू, रुग्णालयाची दुरवस्था, डॉक्टर व परिचारिकांची रिक्त पदे,आदी वेगवेगळ्या समस्यांचा समावेश होता.

शनिशिंगणापूरच्या प्रतिकात्मक मंदिरात महिलांचा प्रवेश
पुरोगामी महाराष्ट्रात शनिशिंगणापूरसह अनेक मंदिरांत आजही महिलांना प्रवेश नाकारला जातो. तातडीने या मंदिरात महिलांना प्रवेश दिला जावा, या मागणीकरिता काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आमदारांनी विधानभवन परिसरात आंदोलन केले.