प्रदेश महिला काँग्रेसचे नेतृत्व विदर्भाला दिल्याचा परिणाम

राजेश्वर ठाकरे, लोकसत्ता

नागपूर : विदर्भातील संध्या सव्वालाखे यांच्या रूपात प्रदेश महिला काँग्रेसला ओबीसी नेतृत्व मिळाल्याने महाराष्ट्र प्रदेश  काँग्रेसचे अध्यक्षपद विदर्भाला मिळण्याची आशा धुसर झाली आहे.

काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदलाचे वारे  वाहत आहेत. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याऐवजी नवीन चेहरा देण्याचा पक्षश्रेष्ठींचा प्रयत्न  आहे. आगामी महापालिका निवडणुका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या  पाश्र्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सुरू आहेत. सध्या मराठा समाज आणि ओबीसी समाज आरक्षणाच्या मुद्यावरून समोरासमोर आला आहे. विदर्भात ओबीसी चळवळ जोमात आहे. त्याचा परिणाम म्हणून विदर्भातील संध्या सव्वालाखे यांची  महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी विदर्भातील इच्छुकांच्या उत्साहावर काहीसे विरजण पडले आहे.  या पदासाठी विदर्भातून विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, बहजन कल्याण, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे ओबीसी नेते इच्छुक आहेत. त्यांच्यासोबतच खासदार राजीव सातव, महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर, पशुसंर्वधन मंत्री सुनील केदार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचीही नावे चर्चेत आहे. बाळासाहेब थोरात यांच्याजागी ओबीसी नेत्यांकडे प्रदेश काँग्रेसची धुरा देण्याची प्रारंभी चर्चा होती.  सध्या प्रदेशाध्यक्षपद आणि प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्षपद दोन्ही  पश्चिम महाराष्ट्रात आहे. काँग्रेसच्या सर्वसमावेश राजकीय धोरणाच्या  ते विरुद्ध आहे. त्यामुळे आता प्रदेशाध्यक्ष विदर्भ किंवा मराठवाडय़ातून आणि ते देखील ओबीसी समाजाला मिळावे यासाठी काँग्रेसमधील एक मोठा गट आग्रही आहे. मात्र, पक्षश्रेष्ठींनी प्रदेश महिला काँग्रेसचे अध्यक्षपद विदर्भातील ओबीसी महिलेकडे  सोपवल्याने प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद मिळेल की नाही, याबाबत विदर्भातील ओबीसी नेते साशंक आहेत. या पाश्र्वभूमीवर पक्षश्रेष्ठी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात, याकडे राज्यातील काँग्रेस नेत्यांचे लक्ष लागले आहे. बाळासाहेब थोरात यांनी स्वत: मंत्रीपद आणि प्रदेशाध्यक्षपदाचा भार सांभाळणे शक्य नसल्याचे पक्षश्रेष्ठींना सांगितले. पण, पक्षश्रेष्ठी आगामी महापालिका आणि जि.प. निवडणुकापूर्वी नवा प्रदेशाध्यक्ष घोषित  करणार का, हा खरा प्रश्न आहे.

महिला काँग्रेस  ही पक्षाची वेगळी आघाडी आहे. त्याचा प्रदेशाध्यक्ष निवडीशी संबंध नसतो. काँग्रेसचा पुढील प्रदेशाध्यक्ष विदर्भ किंवा मराठवाडय़ातील होणे अपेक्षित आहे.

माणिकराव ठाकरे, माजी प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस.