प्रलंबित प्रकल्पांसाठी ठोस कार्यक्रमच नाही
नवीन रेल्वेगाडय़ा, प्रकल्प, मार्गांचाही पत्ता नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा तिसरा रेल्वेअर्थसंकल्पाने विदर्भाची घोर निराशा केली आहे. विदर्भातील विविध रेल्वेमार्गांच्या प्रकल्पांना वेगाने पूर्ण करण्याची आणि रेल्वेचे प्रकल्प मार्गी लागण्याची अपेक्षा होती, परंतु जुन्या प्रकल्पांना किरकोळ तरतूद करून वैदर्भीयांची बोळवण करण्यात आली आहे.
विदर्भातील आदिवासी आणि नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्य़ाला रेल्वेच्या माध्यमातून विकासगंगा घेऊन जाण्याचे अनेक वर्षांपासून स्वप्न दाखवण्यात येत आहे, परंतु हे मार्ग तातडीने पूर्ण करण्याची धडाडी आतापर्यंत कोणत्याही रेल्वेमंत्र्यांनी दाखवलेली नाही. याही अर्थसंकल्पातून या मार्गावर आणखी काही वर्षे रेल्वेगाडी धावेल, अशी शक्यता दिसत नाही. याशिवाय, यवतमाळ-वर्धा-नांदेड मार्गासाठीही ठोस कार्यक्रम आखण्यात आल्याचे दिसत नाही. दरवर्षी थोडय़ा-थोडय़ा निधीची तरतूद करून बोळवण करण्याची भूमिका आताही दिसून आली आहे.
इतवारी ते नागभीड या नॅरोगेज मार्गाचे अनेकदा सव्र्हे झाले. आता पुन्हा नव्याने अहवाल पाठवण्यात आला आहे. हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी १२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे नजिकच्या काळात या मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर होईल, अशी शक्यता दिसत नाही. याशिवाय, नागपुरातून रेल्वे स्थानकावरून दिल्ली, कोलकाता, बंगळुरू आणि चेन्नईसाठी थेट गाडय़ांची मागणी होती. तीही पूर्ण झालेली नाही. सर्वाधिक प्रवासी वाहतूक नागपूर ते मुंबई आणि नागपूर ते पुणे यादरम्यान आहे. या मार्गांवर आणखी गाडय़ा सुरू कराव्या लागणार आहेत, परंतु त्यात सर्वात मोठी अडचण रेल्वेमागार्ंची आहे. त्यामुळे सेवाग्राम ते नागपूर चौथा मार्ग मंजूर करण्यात आला आहे. येथे सध्या तिसरा मार्ग टाकण्यात येत आहे, परंतु हा प्रकल्प ‘हायब्रिड’ म्हणजे रेल्वे आणि खासगी कंत्राटदार मिळून पूर्ण करावयाचा आहे, असे मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक ओ.पी. सिंह म्हणाले.
रेल्वे झोन आणि रेल्वे भरती मंडळ ही दोन प्रमुख कार्यालये नागपुरात स्थापन करण्याची मागणी होती. त्याकडेही दुर्लक्ष झाले आहेत. विदर्भ, मराठवाडय़ातील टक्का वाढण्यासाठी या दोन प्रमुख कार्यालयांची आवश्यकता आहे. त्यामुळे सहा विभाग असलेल्या मध्य-दक्षिण रेल्वेचे नांदेड विभाग, मध्य रेल्वेचा नागपूर विभाग आणि दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेचा नागपूर मिळून झोन स्थापन करण्याची मागणी आहे.

हे प्रकल्प मार्गी केव्हा लागणार?
* इतवारी-नागभीड रेल्वे मार्ग ब्रॉडगेज
* वडसा-देसाईगंज ते गडचिरोली नवीन रेल्वेमार्ग
* वर्धा-यवतमाळ-नांदेड नवीन मार्ग
* बडनेरा येथे कोच दुरुस्ती कारखाना
* गडचांदूर-आदिलाबाद, बल्लारशा-सूरजागड नवीन मार्ग
* नागपुरात वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय
* खापरी येथील नीर प्लान्ट