कलावंतांमधील वाद व परस्पर समन्वयाचा अभाव; नाटय़ वर्तुळातून खेद व्यक्त
ठाणे येथे १९ ते २१ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या नाटय़ संमेलनात विदर्भातील कलावंतांना प्रतिनिधित्व मिळालेले नाही. गेल्या चार वर्षांंपासून अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलन आयोजित करण्याचा मान उपराजधानीला मिळालेला नाही. असे असले तरी संमेलनात कला सादर करण्यासाठी प्रतिनिधित्व मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, कलावंतांमधील वाद आणि नागपूर शाखेतील परस्परांशी समन्वयाअभावी सलग दुसऱ्या वर्षी विदर्भाला डावलण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
अखिल भारतीय नाटय़ परिषदेच्या नागपूर शाखेत अनेक वषार्ंपासून कलावंतांमध्ये असलेले हेवेदावे बघता शहरात नाटय़ परिषदेची दुसरी शाखा स्थापन करण्यात आली. एकाच शहरात दोन शाखा असल्यामुळे त्यांचे वेगवेगळे कार्यक्रम होऊ लागले. गेल्या चार-पाच वर्षांंपासून उपराजधानीला नाटय़ संमेलन आयोजित करण्याचा मान मिळालेला नाही. परिषदेच्या मध्यवर्ती शाखेत नियामक मंडळावर नागपूरचे चार सदस्य असूनही उपराजधानीवर ही वेळ यावी, यासारखे दुर्देव नसल्याची प्रतिक्रिया नाटय़ वर्तुळात व्यक्त होत आहे.
नाटय़ संमेलनासाठी राज्यातील विविध नाटय़ शाखांमधून प्रस्ताव मागितले जातात. गेल्या तीन वर्षांंपासून नागपूरचाही प्रस्ताव पाठविला जात आहे. मात्र, दरवर्षी कुठले ना कुठले कारण देऊन विदर्भाला टाळले गेले.
दरवर्षी होणाऱ्या नाटय़ संमेलनात नागपूरच्या कलावंतांना कुठल्या ना कुठल्या तरी कार्यक्रमात संधी दिली जात होती. मात्र, गेल्या दोन वर्षांंपासून अनेक चांगले कलावंत आणि संस्था असतानाही त्यांचा विचारच करण्यात आलेला नाही.
नाटय़ परिषदेच्या मध्यवर्ती शाखेत नागपूरमधून प्रमोद भुसारी, किशोर आयलवार, दिलीप देवरणकर आणि पराग लुले या कलावंतांचा समावेश आहे. त्यातील प्रमोद भुसारी यांना, नियामक मंडळाच्या कार्यकारिणीत वाद म्हणून उपाध्यक्षपदावरून हटविण्यात आले होते. मात्र, भुसारी या संदर्भात न्यायालयात गेल्यावर या निर्णयाला स्थगिती मिळाल्यामुळे ते सध्या कार्यकारिणीत आहेत. नाटय़ संमेलनातील कार्यक्रम निश्चित झाले आहेत. त्यात विदर्भाचे प्रतिनिधित्व नसल्याचे नियामक मंडळाकडून सांगण्यात आले. अन्य शहरातील नाटय़ परिषदेच्या शाखांच्या कार्यक्रमांचा समावेश केला जात असताना, उपराजधानीत कलावंत किंवा चांगल्या नाटय़ संस्था नव्हत्या का?, असाही प्रश्न आता कलावंत उपस्थित करीत आहे.
नाटय़ परिषदेच्या नागपूर शाखेचे सचिव नरेश गडेकर यासंदर्भात म्हणाले, नाटय़ संमेलन हे अखिल भारतीय नाटय़ संमेलन असताना त्यात पुण्या-मुंबईच्या कलावंतांनाच संधी दिली जाते. प्रत्येक नाटय़ शाखेला कार्यक्रमासंदर्भात प्रस्ताव पाठविणे गरजचे आहे.
मात्र, असा प्रस्ताव यावेळी आलाच नाही. नाटय़ परिषदेची मध्यवर्ती शाखा आणि ज्या ठिकाणी नाटय़ संमेलन असते तेथील पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम ठरवताना विदर्भाचे प्रतिनिधित्व असले पाहिजे, असा आग्रह करायला हवा. मात्र, तसे होताना दिसत नाही.
मध्यवर्ती शाखेच्या नियामक मंडळातील सदस्य दिलीप देवरणकर म्हणाले, यावर्षी ठाण्यामध्ये होणाऱ्या नाटय़ संमेलनात कुठल्याच नाटय़ शाखेचे कार्यक्रम होणार नाही किंवा कुणालाही प्रस्ताव पाठविण्यात आले नाही.
विदर्भातील कलावंतांचे कार्यक्रम का नाही, याबाबत आपल्याकडील कलावंतांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. नाटय़ परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या नाटय़ स्पर्धातील पहिल्या तीन एकांकिका संमेलनात सादर होणार आहेत. त्यात नागपूरची एक एकांकिका असल्याचे ते म्हणाले.