पाऱ्याने पस्तीशी ओलांडली

दहा वर्षांतील तापमानाचा निच्चांक नोंदवून हिवाळ्याची अखेर झालेली असतानाच दिवसा अलगद बसणाऱ्या उन्हाच्या चटक्यांनी उन्हाळ्याची चाहूल दिली आहे. आठवडाभरापूर्वी बेजार करणाऱ्या आणि गारठवून टाकणाऱ्या थंड वाऱ्यांनी आता विश्रांती घेतली आहे. त्याचवेळी आता दिवसा गरम वारे वाहायला सुरुवात झाली आहे. तापमानाचा पाराही आता झपाटय़ाने वर सरकत असून आठवडय़ाभरातच त्याने पस्तीशी गाठली. त्यामुळे पुन्हा ‘झळा या लागल्या जीवा.’ असे म्हणत वैदर्भीय उन्हाळ्यासाठी सज्ज झाले आहेत.

विदर्भात अकोला, चंद्रपूर, वर्धा, ब्रम्हपुरी, खामगाव, पुसद ही सर्वाधिक तापणाऱ्या शहरांसह नागपूरनेही तापमानाच्या पाऱ्याची पस्तीशी कधीचीच ओलांडली आहे. अकोल्यासह ब्रम्हपुरी, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्य़ांमध्ये कमाल तापमान ३५ आणि ३६ अंश सेल्सिअसवर, तर किमान तापमानसुद्धा १४ ते १७ अंश सेल्सिअसपर्यंत जाऊन पोहोचले आहे.

जागतिक पातळीवरच दिवसेंदिवस तापमान वाढीस लागले आहे. उन्हाळ्यातील तापमानाचा पारा नवनवे उच्चांक स्थापन करत आहे. यंदाही पारा चढताच राहील, असे संकेत हवामान अभ्यासकांनी दिले आहेत. तापमानवाढीचा हा संकेत केवळ विदर्भापुरताच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला त्याची झळ बसणार आहे. जानेवारीचा उत्तरार्ध वगळता यावर्षी हिवाळा फारसा जाणवलाच नाही. पावसाची स्थितीही काहीशी अशीच होती. जूनच्या पहिल्या आठवडय़ात संपूर्ण महिन्याची सरासरी पावसाने गाठली. त्यानंतर पावसाळ्याच्या प्रत्येक महिन्यात आठवडय़ाच्या सुरुवातीला पाऊस आणि एकदा पूरस्थिती ओढवणारा पाऊस वगळला तर यंदाही पावसाने पाठच फिरवली. त्यामुळे हिवाळा अनुभवावा, अशी थंडी पडलीच नाही. जानेवारीच्या अखेरीस आठवडाभर तापमानाचा पारा पाच ते साडेपाच अंश सेल्सिअसच्या दरम्यान खेळता राहिला आणि आता मात्र पाऱ्याने अचानक उसळी घेतली. गेल्या आठवडय़ाभरापासून दिवसाला गरम वाऱ्याच्या झळा जाणवू लागल्या आहेत. दिवसा बाहेर पडल्यानंतर घसा कोरडा होणे, वारंवार तहान लागणे, थकवा जाणवणे ही उन्हाळ्याची लक्षणे अनुभवास येऊ लागली आहेत. बंद असलेले पंखे आता पुन्हा सुरू झाले असून येत्या काही दिवसातच कुलर आणि एसी सुरू होतील, असे संकेत उन्हाच्या झळांनी दिले आहेत. रात्री आणि पहाटे जाणवणारा गारवासुद्धा आता हरवत चालला आहे. थंड वाऱ्याची झुळूक आणि उन्हाच्या झळा यामुळे वातावरण काहीचे विचित्र झाले असून सर्दी, खोकला, ताप, उलटय़ांनी बेजार असणारे रुग्ण रुग्णालयात दिसत आहेत. त्यामुळे डॉक्टरांनीसुद्धा या वातावरणात विशेष काळजी घेण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.