दक्षिण आणि मध्य नागपूर मतदारसंघासाठीचे मतदान यंत्र  असलेल्या ‘स्ट्राँग रूम’चे मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दक्षिण आणि मध्य नागपूर मतदारसंघासाठीचे मतदान यंत्र  असलेल्या ‘स्ट्राँग रूम’ बाहेरील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचा आरोप काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला होता. निवडणूक आयोगाने तातडीने याकडे लक्ष घालावे, अशी मागणी त्यांनी केली होती. यावेळी त्यांनी पुराव्यादाखल एक चित्रफितही दाखवली.  दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातील स्ट्राँग रूमधील कॅमेरे २७ मार्च २०१९ सायंकाळी ५.५५ वाजता बंद होते. एलईडी स्क्रिन डिस्प्लेवर स्ट्राँग रूममधील चित्र दिसत नव्हते. तसेच जीआयओ राऊटर आणि इतर उपकरणे खुल्या अवस्थेत आढळून आले. भाजपचा झेंडा रंगवलेल्या ट्रकमधून निवडणूक साहित्य/ईव्हीएम उतरवण्यात झाले. हे निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वाचे उल्लंघन आहे. यामुळे निडणूक यंत्रणेवर  संशय निर्माण होत आहे. याशिवाय मध्य नागपूर मतदारसंघात पंचायत भवन  येथे २५ मार्च २०१९ ते २७ मार्च २०१९ दरम्यान सीसीटीव्ही कॅमेरे पूर्णपणे नादुरुस्त होते. त्यामुळे या काळात रिकॉर्डिग झालेले नाही, असा दावा पटोले यांनी केला होता.

पटोले यांच्या पत्रकार परिषदेनंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. स्ट्राँग रुममध्ये मोबाईलद्वारे चित्रीकऱण करण्याच बंदी असताना मोबाईलवर चित्रीकरण करण्यात आले, असे तक्रारीत म्हटले होते. या आधारे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.