बँकांशी संगनमत करून शेकडो शेतकऱ्यांच्या नावे कर्ज उचलणारे गंगाखेड शुगर अँड एनर्जीचे रत्नाकर गुट्टे हे महाराष्ट्राचे छोटे नीरव मोदी असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेत केले. गुट्टे यांनी ६०० शेतकऱ्यांच्या नावे ५५०० हजार कोटी रूपयांचे कर्ज उचलले. यात मृत शेतकऱ्यांच्या नावानेही त्यांनी कर्ज उचलल्याचा आरोप मुंडे यांनी केला. डीएस कुलकर्णींवर कारवाई होते मग रत्नाकर गुट्टे मोकळे कसे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

विधानपरिषदेत मुंडे यांनी गुट्टे यांच्या कारनाम्याचा पाढाच वाचला. ते म्हणाले, गुट्टे यांनी गंगाखेड सोलार कंपनी स्थापन केली आहे. पण या कंपनीचा कोणताही प्रकल्प कार्यान्वीत नाही. त्यांनी ६०० शेतकऱ्यांच्या नावावर हजारो कोटी रूपयांचे कर्ज उचलले. यात काही मृत शेतकऱ्यांच्या नावाचाही समावेश आहे. या शेतकऱ्यांना आता वसुलीसाठी बँकांच्या नोटिसा गेल्या आहेत. बँकेला हाताशी धरून केलेला हा प्रकार आहे.

गुट्टे यांनी बँकांशी संगनमत करून रिझर्व्ह बँकेच्या परवानगीविना हे व्यवहार केले आहेत. या सर्वप्रकाराची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. गुट्टे यांनी उचललेल्या कर्जाची अनेक शेतकऱ्यांना कल्पनाही नाही. त्यांच्या परस्पर कर्जे उचलली आहेत. गुट्टे यांनी स्थापन केलेल्या कंपन्या या बनावट कंपन्या आहेत, असे ते म्हणाले.

सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनीही असा प्रकार होणे दुर्दैवी असल्याचे म्हटले. रत्नाकर गुट्टे यांनी २०१४ मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाकडून (रासप) निवडणूक लढवली होती. रासप हा भाजपाचा सहकारी पक्ष आहे. दुग्धविकास मंत्री महादेव जानकर हे या पक्षाचे प्रमुख आहेत.