मुख्यमंत्र्यांच्या शहरातच महायुतीला तडा

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात एकीकडे महायुती झाली असताना मुख्यमंत्र्यांच्या शहरात दक्षिण नागपूर मतदारसंघात मात्र शिवसैनिकांनी भाजप उमेदवारांच्या विरोधात बंड पुकारले आहे. ‘हीच ती वेळ’ म्हणून नागपूर शहर शिवसेनेने अपक्ष उमेदवार किशोर कुमेरिया यांच्या प्रचारार्थ गुरुवारी शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करून भाजपच्या नेत्यांवर टीका केली.

महायुतीमध्ये २००९ मध्ये युती झाली. तेव्हा दक्षिण नागपूर हा शिवसेनेकडे गेल्यामुळे या मतदारसंघात शिवसेनेकडून किशोर कुमेरिया निवडणूक लढले होते. काँग्रेसचे दीनानाथ पडोळे यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर २०१४ ला महायुती झाली नाही. शिवसेना स्वतंत्र लढली आणि भाजपचे विद्यमान आमदार सुधाकर कोहळे विजयी झाले.  यावेळी किशोर कुमेरिया यांनी उमेदवारी मागितली. मात्र हा मतदार संघ भाजपकडे असल्यामुळे माजी आमदार मोहन मते यांना उमेदवारी दिली. त्यामुळे कुमेरिया यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. त्यांच्या समर्थनार्थ रेशीमबागेतील महात्मा फुले सभागृहात शिवसैनिकांचा मेळावा झाला. या मेळाव्यात शिवसेनेचे शहरातील पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्वच पदाधिकाऱ्यांनी कुमेरिया यांच्या पाठीशी राहण्याचा निर्धार करत भाजपवर टीका केली. या शिवसैनिकांच्या मेळाव्याला जिल्हाध्यक्ष प्रकाश जाधव, शहर अध्यक्ष मंगेश कढव, राजू तुमसरे, अजय दलाल, किशोर पराते, बंडू तागडे, अलका दलाल, प्रवीण जुमडे, किशोर ठाकरे, युवा सेना जिल्हा प्रमुख विक्रम राठोड आदी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.