उमेरड मतदारसंघात भाजप, काँग्रेस आणि बसपा अशी तिहेरी लढत असून वंचित बहुजन आघाडीची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

२०१४ च्या निवडणुकीतील पहिल्या तीन क्रमांकाची मते घेणारे उमेदवार याही वेळी रिंगणात आहेत. मात्र यापैकी दोन उमेदवारांचे पक्ष बदलले आहे. भाजपचे विद्यमान आमदार सुधीर पारवे तिसऱ्यांदा उभे आहेत. गतवेळी बसपाकडून दुसऱ्या क्रमांकाची मते घेणारे रुक्षदास बन्सोड यावेळी वंचित आघाडीकडून नशीब आजमावत आहेत, तर अपक्ष म्हणून तिसऱ्या क्रमांकाची मते घेणारे राजू पारवे यावेळी काँग्रेसचे उमेदवार आहेत.

२००९ मध्ये काँग्रेसकडे सक्षम उमेदवार नसल्याने सुधीर पारवे विजयी झाले होते. त्यानंतरच्या पाच वर्षांत आमदार म्हणून ठोस कामगिरी न केल्याने त्यांच्याविषयी नाराजी होती. पण दलित मतांचे विभाजन आणि मोदी लाट याचा फायदा त्यांना २०१४ च्या निवडणुकीत झाला. २०१९ च्या निवडणुकीतही पारवेविरुद्ध नाराजी कमी झाली नाही. पाच वर्षांत सरकारकडून झालेली विकास कामे हा त्यांच्या प्रचाराचा प्रमुख आधार आहे. प्रभावी प्रचार यंत्रणा एकगठ्ठा दलितेत्तर मते या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. दुसरीकडे काँग्रेसचे राजू पारवे यांचा व्यक्तिगत जनसंपर्क  आहे. शिवाय यावेळी त्यांना काँग्रेसच्या पारंपरिक मतांची जोड मिळणार आहे. या भागाचे माजी आमदार व  काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी संपूर्ण शक्ती त्यांच्यामागे उभी केली आहे. .  बसपाने संदीप मेश्राम यांना उमेदवारी दिली आहे. मागील निवडणुकीत हा पक्ष दुसऱ्या क्रमांकावर होता. वंचितने बसपाच्या संघटनात्मक बांधणीची माहिती  असलेल्या बन्सोड यांना उमेदवारी दिली आहे.