माध्यम ताकदीपुढे सारेच चूप; दर्डाच्या वक्तव्यावर काँग्रेस वर्तुळात चर्चेला उधाण

उमेदवारी नाकारण्यात आलेले काँग्रेसचे मावळते खासदार विजय दर्डा यांनी रविवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घेतलेली भेट व त्यानंतर केलेल्या वक्तव्यावर काँग्रेसच्या वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटली असली तरी दर्डाची माध्यम ताकद लक्षात घेता यावर उघडपणे कुणी बोलायला तयार नाही. नागपूरचे माजी खासदार विलास मुत्तेमवार यांनी मात्र ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांनी उगीच किंतु परंतु करू नये, असा टोला दर्डाचे नाव न घेता आज लोकसत्ताशी बोलताना लगावला.

पहिल्यांदा अपक्ष व नंतर दोनदा पक्षाकडून राज्यसभेवर गेलेले विजय दर्डा यावेळी उमेदवारी मिळत नाही, असे लक्षात येताच रविवारी थेट गडकरींच्या भेटीला त्यांच्या वाडय़ावर गेले. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपने राज्यसभेवर पाठवले तर नक्कीच आनंद होईल, असे मत व्यक्त केले होते. या घडामोडीवर काँग्रेसच्या वर्तुळात बरीच चर्चा सुरू झाली आहे. आजवर सोनिया गांधींना आदर्श नेत्या म्हणणारे दर्डा पद मिळणार नाही, हे लक्षात येताच भाजपच्या दारी जात संधीसाधूपणाचा परिचय देतात. अशा नेत्यांमुळेच काँग्रेस पक्ष अनेकदा अडचणीत आला आहे, असे मत या पक्षाचे पदाधिकारी आता खासगीत बोलून दाखवत आहेत. दर्डा यांनीकेवळ दबाव निर्माण करण्यासाठी ही राजकीय खेळी खेळली, असाही सूर पक्ष वर्तुळात आहे.

मात्र, दर्डाची माध्यम ताकद लक्षात घेता पक्षातील कुणीही या घडामोडींवर उघडपणे मात्र बोलायला करायला तयार नाही. दर्डाचे भविष्यातील राजकारण कसे राहणार, याची चुणूक रविवारच्या घडामोडीतून दिसून आली असली तरी अजून त्यांनी पक्ष सोडलेला नाही, असे एका पदाधिकाऱ्याने नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर सांगितले.

दर्डानी आत्मपरीक्षण करावे -मुत्तेमवार

दर्डाचे राजकीय विरोधक व नागपूरचे माजी खासदार विलास मुत्तेमवार यांनी मात्र दर्डाचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. आता अडचणीच्या काळात पक्षाला ज्यांचा उपयोग आहे अशांना यावेळी संधी देण्यात आली.

ज्यांना संधी मिळाली नाही त्यांनी हा उपयोगितेचा मुद्दा लक्षात घेणे गरजेचे आहे, असे मुत्तेमवार म्हणाले. ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांनी उगीच किंतु परंतु करत फाटे फोडणे योग्य नाही. पक्षाने आजवर आपल्याला काय दिले, याचाही विचार करून आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला मुत्तेमवारांनी दिला.

तसे बोललोच नाही – दर्डा

गडकरींच्या भेटीनंतर राज्यसभेत जाण्याची संधी मिळाली तर आनंदच होईल, असे मी म्हणालो. भाजपने संधी दिली तर आनंद होईल असे म्हणालो नाही. भाजपने काय करावे आणि काय नाही, हा त्या पक्षाचा प्रश्न आहे असे मी बोललो होतो. त्याचा विपर्यास माध्यमांनी केला असा दावा विजय दर्डा यांनी आज एका प्रसिद्धी पत्रकातून केला आहे.