काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या आपल्या आदर्श आहेत, असा नेहमीच दावा करणारे काँग्रेसचे राज्यसभेचे मावळते सदस्य विजय दर्डा यांनी त्यांना पक्षाने पुन्हा संधी नाकारताच रविवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या वाडय़ावर भेट घेऊन भाजपकडून राज्यसभेवर जाण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
दर्डा हे सलग १८ वर्षांपासून राज्यसभेचे सदस्य आहेत. सर्वप्रथम ते १९९८ मध्ये राज्यसभेत गेले. त्यानंतर २००४ आणि २०१० मध्ये त्यांना संधी मिळाली. त्यांच्या तिसऱ्या टर्मचा कार्यकाळ संपत आहे. पुन्हा उमेदवारी मिळावी म्हणून दर्डा यांनी प्रयत्न केले होते, पण महाराष्ट्रात काँग्रेसकडे असलेले आमदारांचे संख्याबळ लक्षात घेता फक्त एकच उमेदवार विजयी होऊ शकतो. पक्षाने यासाठी माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांना उमेदवारी दिली. काँग्रेसकडून पुन्हा राज्यसभेवर जाण्याची संधी हुकल्याने अस्वस्थ झालेल्या दर्डा यांनी लगेचच रविवारी नागपुरात नितीन गडकरी यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना गडकरी यांनी ही भेट सहज होती, असे सांगितले. मात्र, दर्डा या भेटीमागचा राजकीय हेतू लपवू शकले नाही, राज्यसभेच्या उमेदवारीबाबत त्यांना विचारणा केली असता भाजपने संधी दिल्यास आपल्याला आनंदच होईल, असे त्यांनी सांगितले.
दोनदा काँग्रेसकडून आणि एकदा अपक्ष उमेदवार म्हणून राज्यसभेचे सदस्य राहिलेल्या दर्डा यांचे २०१२ मध्ये कोळसा खाणपट्टे वाटप घोटाळ्यात नाव आले आहे. त्याचप्रमाणे जुलै २०१२ मध्ये अहमदाबाद येथील एका कार्यक्रमात दर्डा यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळल्याने वादंगही माजले होते. या सर्व पाश्र्वभूमीवर दर्डा यांचा राज्यसभेत पत्ता कापला जाणार, असे संकेत मिळत होते. त्यादृष्टीने दर्डानी भाजपशी जवळीकही निर्माण करायला सुरुवात केली होती.

भाजपकडून राज्यसभेवर जाण्यास इच्छुक आहे. त्यांनी संधी दिल्यास देशाची आणखी सेवा करता येईल. मात्र, याबाबतचा निर्णय भाजपने घ्यायचा आहे. गडकरींची भेट वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतनासाठी होती. त्यांच्या व माझ्या मित्रत्वाची कल्पना काँग्रेस पक्षश्रेष्ठींना आहे. पक्षाने उमेदवारी नाकारली तरी आपण नाराज नाही.
-विजय दर्डा, सदस्य, राज्यसभा