विजय वडेट्टीवार यांची मुख्यमंत्र्यांवर टीका

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा म्हणजे सरकारच्या अपयशावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज शुक्रवारी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत केली.

शेतकरी कर्जमाफी, युवकांच्या रोजगाराचा प्रश्न अशा सगळ्या आघाडय़ांवर सरकार अपयशी ठरले आहे. म्हणून आता जनादेश आदेश यात्रा काढून मतांची भीक मागण्याचा नवीन उद्योग सरकारने सुरू केला आहे, असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला. भाजपची महाजनादेश यात्रा शुक्रवारी नागपुरात दाखल झाली. या पाश्र्वभूमीवर ते बोलत होते.

वडेट्टीवार म्हणाले, गेल्या पाच वर्षांत शेतकरी आत्महत्या, कर्ज न मिळणे, बेरोजगारी, उद्योगधंदे बंद पडणे, यावरही मुख्यमंत्र्यांनी या यात्रेत बोलले पाहिजे. गेल्या पाच वर्षांत बेरोजगारीने ४५ वर्षांतील उच्चांक गाठला आहे. लाखो लोकांचा व्यवसाय हिरावला. या काळात नवीन उद्योग नाही. ३० लाख शेतकरी पात्र असूनही कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. पीक विमा मिळाला नाही. शेतकऱ्यांना नवीन कर्ज दिले जात नाही. खतांचे भाव २५ ते ३० टक्के वाढवण्यात आले. भाजपची महाभरती आणि त्यांना आलेले फोन यावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले, वर्षां बंगल्याहून फोन आला नाही, हे मी यापूर्वी स्पष्ट केले आहे. मातोश्रीहूनही फोन आला नाही. पण उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांनी २४ वेळा फोन केला. एक-दोन वेळा घेतला आणि त्यांना पक्षप्रवेशाबाबत स्पष्ट नकार दिला.

ईव्हीएममुक्तीसाठी मोर्चा : अनेक स्वयंसेवी संघटना आणि सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन ईव्हीएममुक्तीसाठी ९ ऑगस्टला क्रांतीदिनी आंदोलन पुकारले आहे. भाजपला लोकसभेत जनादेश मिळाला तर लोकांमध्ये उत्साह का दिसला नाही. लोकांमध्ये सरकारविरोधात प्रचंड नाराजी असताना निवडणुकीचा निकाल असा कसा आला, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ईव्हीएम घोळ पुढे आला आहे. सरकारला खरच त्यांच्या मागे जनादेश आहे, असे वाटत असेल तर एकदा मतपत्रिकेने निवडणुका घेऊन दाखवाव्यात. जनतेच्या मतांशी बेईमानी करून जनादेश मिळल्याची शेखी मिरवू नये, अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली.