‘सेंटर फॉर पीपल्स कलेक्टिव्ह’चे प्रवीण मोते यांचे मत; लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट

गावे आर्थिकदृष्टीने  मजबूत झाली पाहिजेत आणि त्या दृष्टिकोनातूनच आम्ही गाव आणि गावकऱ्यांशी संवाद साधून माहिती गोळा करतो. त्या माहितीच्या आधारावर गावाचा विकास आराखडा तयार करतो. शेतजमीन कमीकमी होत चालली आहे, निसर्गाच्या अवकृपेमुळे उरलेल्या शेतीतील उत्पादन कमी होत आहे. अशावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना नेमके काय हवे, हे जाणून घेतले तरच गावाचा विकास होईल, असे मत ‘सेंटर फॉर पीपल्स कलेक्टिव्ह’चे प्रवीण मोते यांनी व्यक्त केले. लोकसत्ता कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीत त्यांनी गावाच्या एकूणच विकासाकरिता नेमके काय करायला हवे आणि त्यांचे केंद्र या दृष्टिकोनातून काय करत आहे, यावर संवाद साधला.

मोते म्हणाले, ‘सेंटर फॉर पीपल्स कलेक्टिव्ह’च्या माध्यमातून गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांना नेमके काय हवे, त्यांची मूळ गरज काय हे जाणून घेतले जाते. या माध्यमातून त्या गावांची आणि गावकऱ्यांची माहिती गोळा करून त्यांच्या विकासासाठी आराखडा तयार केला जातो.

गावातील लोकांची आर्थिक स्थिती, खाणींमुळे प्रभावित लोकांची स्थिती, जंगलावर आधारित लोकांचे आर्थिक स्रोत कसे मजबूत करता येतील हे पाहिले जाते. विशेष म्हणजे, गावातील लोक हुशार आहेत. त्यांना फार काही सांगण्याची गरज नाही. मात्र, शेती तसेच आर्थिक अडचणींअभावी त्यांना काही करता येत नाही.

त्यामुळे आहे त्या परिस्थितीत त्यांना काय करता येईल. आर्थिक अडचणीतून ते कसे बाहेर येऊ शकतील आणि विकास कसा होऊ शकेल हे जाणून घेण्याचा प्रयत्न आमची संस्था करते. दर तीन महिन्यांनी ही माहिती गोळा करून त्या अनुषंगाने विविध योजना तयार केल्या जातात.

सध्याच्या स्थितीत आम्ही ‘सामूहिक विकास’ कसा होऊ शकतो हे बघत आहोत. आठ-दहा गावे एकत्रित येऊन काही करू शकतात का, याकरिता त्यांच्यातील कौशल्य ओळखून काम केले जात आहे. गावातून शहराकडे होणारे स्थलांतरण वाढले आहे. मात्र, शहरांकडेही आर्थिक स्रोत इतके नाहीत. अशावेळी गावांचे आर्थिक स्रोत मजबूत करून गावकऱ्यांना चांगले आयुष्य देता येऊ शकते.

संस्थेचे कार्यक्षेत्र विस्तारतेय

सध्या आम्ही पूर्व विदर्भातल्या जिल्ह्यत काम करीत आहोत. हळूहळू हे नेटवर्क संपूर्ण विदर्भात आणि त्यानंतर महाराष्ट्रात पोहोचवू. तसेच राज्यालगतच्या मध्यप्रदेशातील बालाघाट, शिवणी, छिंदवाडा तसेच छत्तीसगडमधील राजनांदगाव, तेलंगणातील आदिलाबाद, करीमनगर यासारखे जिल्हे सोबत घेऊन काम करायचे आहे.

सहा जिल्ह्यत २० गावे जोडली

गेल्या तीन वर्षांत आम्ही सहा जिल्ह्यत २० गावे जोडली. सुमारे २०० ते ३०० गावांची आणि त्यातील २० हजार गावकऱ्यांची माहिती आमच्याकडे गोळा झाली आहे. खाण प्रभावित गावातील लोकांना रस्त्यांची नव्हे तर अंगणवाडीची गरज आहे. हे देखील या माहिती गोळा करण्यातूनच समोर आले. आता या २० हजार लोकांना हव्या असणाऱ्या गोष्टींवरून योजना, आराखडे आम्ही तयार करत आहोत. ते सरकापर्यंत पोहोचवले तर त्यावर  धोरण तयार करता येईल आणि त्या गावाचा सर्वच स्तरावर विकास होऊ शकेल.