महापालिकेचा एड्स जनजागृती कार्यक्रम
एड्स जनजागृती अभियान आणि हनुमान चालिसा पठण कार्यक्रमाच्या आयोजनासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे आयोजकांकडून उल्लंघन झाल्याचे दिसून आले.
सरकारी, निमसरकारी संस्थांना एखाद्या धार्मिक कार्यक्रमासाठी परवानगी देता येऊ शकत नाही. महापालिकेने एड्स जनजागृतीचा आणि पोद्दारेश्वर राम मंदिर समितीने हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम करावा. दोन्ही कार्यक्रमांमध्ये किमान एक तासाचे अंतर ठेवावे आणि महापालिका व पोद्दारेश्वर राममंदिराने आपापला खर्च उचलावा, असे उच्च न्यायालयाच्या आदेशात नमूद आहे. कस्तुरचंद पार्कवर गुरुवारी रात्री झालेल्या या दोन्ही कार्यक्रमात एक तासाचे अंतर राखण्यात आले नाही. एड्स जनजागृती अभियानाला ६ वाजून ५७ मिनिटांनी प्रारंभ झाले. हा कार्यक्रम ७ वाजून ४४ मिनिटांनी संपला. त्यानंतर लगेच गीत गायनाचा कार्यक्रम सुरू झाला आणि ८ वाजून २५ मिनिटांनी हनुमान चालिसा पठणाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. याचाच अर्थ दोन्ही कार्यक्रमादरम्यान केवळ ४१ मिनिटांचे अंतर होते. शिवाय एड्स जनजागृती अभियानाच्या कार्यक्रमात धार्मिक बॅनर आणि झेंडे हातात घेऊन आणि डोक्यावर टोप्या घालून युवक सहभागी झाले होते. याच युवकांनी एड्स संबंधित कार्यक्रम संपताचा कार्यक्रमस्थळी झेंडे आणि बॅनर लावले.
महापालिका कार्यक्रमाच्या व्यासपीठावर कोणत्याही प्रकारे ‘हनुमान चालिसा’ पठणाचा उल्लेख असू नये, न्यायालयाने आदेशात नमूद केले होते. आयोजकांनी मात्र एड्सविषयक कार्यक्रम असल्याचे भासेल, असे कोणतेही बॅनर किंवा फलक व्यासपीठावर लावल्याचे टाळले होते. पोद्दारेश्वर राममंदिर समितीने महापालिकेच्या कार्यक्रमानंतर एक तासाने ‘हनुमान चालिसा’ पठणाचा कार्यक्रम घ्यावा, पण तेथे ‘एड्स जनजागृती’ कार्यक्रमाचा उल्लेख असू नये, असे न्यायालयाच्या आदेशात नमूद आहे. संचालनकर्त्यांने न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याचे वारंवार आवाहन केले. धार्मिक कार्यक्रमात एड्सचा उल्लेखही झाला नाही. पण हा कार्यक्रम सुरू असताना मात्र महापालिकेच्या आरोग्य विभागाचे बॅनर ठिकठिकाणी लावले होते.
कार्यक्रमाच्या खर्चाबाबतही न्यायालयाने आदेश दिले आहेत. एड्समुळे आज सर्वधर्मीय लोक ग्रस्त आहेत. त्यामुळे धर्मनिरपेक्ष राष्ट्राच्या संकल्पनेत केवळ विशिष्ट धर्मीयांसाठी असा कार्यक्रम घेणे योग्य नाही. प्रत्येक धर्माच्या नेत्यांनी स्वत:च्या खिशातून खर्च करून धार्मिक कार्यक्रम आयोजित करावेत, असे न्यायालयाने म्हटले आहे. नागपूर महापालिकेच्या स्थायी समितीने १६ लाखांचा निधी मंजूर केला आहे. मात्र, या कार्यक्रमाचा खर्च किती आणि कोण किती देणार हे अद्याप निश्चित झालेले नाही.

धार्मिक कार्यक्रमात आरोग्य विभागाचे बॅनर
महापालिका कार्यक्रमाच्या व्यासपीठावर कोणत्याही प्रकारे ‘हनुमान चालिसा’ पठणाचा उल्लेख असू नये. ‘हनुमान चालिसा’ पठणाचा कार्यक्रमात ‘एड्स जनजागृती’ कार्यक्रमाचा उल्लेख असू नये, असे न्यायालयाच्या आदेशात नमूद आहे. त्यानुसार धार्मिक कार्यक्रमात एड्सचा उल्लेखही झाला नाही, पण हा कार्यक्रम सुरू असताना मात्र महापालिकेच्या आरोग्य विभागाचे बॅनर ठिकठिकाणी लावले होते.

एक तासाऐवजी ४१ मिनिटांचे अंतर
एड्स जनजागृती अभियानाला ६ वाजून ५७ मिनिटांनी प्रारंभ झाले. हा कार्यक्रम ७ वाजून ४४ मिनिटांनी संपला. त्यानंतर लगेच गीत गायनाचा कार्यक्रम सुरू झाला आणि ८ वाजून २५ मिनिटांनी हनुमान चालिसा पठणाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. याचाच अर्थ दोन्ही कार्यक्रमादरम्यान केवळ ४१ मिनिटांचे अंतर होते.