स्टीफन हॉकिंग एक अद्वितीय व्यक्तिमत्त्व

जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांच्या मृत्यूने जगभर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. २१व्या शतकातील प्रज्ञावंत म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. शरीराची पंचेंद्रिये निकामी झाली असतानाही केवळ मेंदू आणि संगणकाच्या माध्यमातून ते कोटय़वधी लोकांपर्यंत पोहोचले. त्यांच्या ‘ब्लॅक होल’  थेअरीने जगातील शास्त्रज्ञांना अचंबित केले. खगोलभौतिकी आणि विश्वोत्पत्ती शास्त्रातील त्यांच्या अनेक सिद्धांताचे नागपुरातही चाहते आहेत. त्यांच्या निधनानंतर स्टीफन हॉकिंग एक अद्वितीय व्यक्तिमत्त्व असल्याच्या प्रतिक्रिया त्यांच्या नागपुरातील चाहत्यांनी ‘लोकसत्ता’कडे व्यक्त केल्या.

विज्ञानाला चालना दिली

वयाच्या ३०व्या वर्षी स्टिफन यांना पक्षाघात झाला.  फक्त त्यांचा मेंदू काम करायचा. ‘डार्क मॅटर’ आणि ‘डार्क एनर्जी’ ही त्यांनी विज्ञानाला दिलेली देण आहे. विश्वाच्या निर्मितीचे सूत्र त्यांनी मांडले. गुरुत्वाकर्षण लहरी ही संकल्पना हॉकिन्सच्या थेअरीतून पुढे आली. ते बोलू आणि फिरू शकत नव्हते. आवाजही यायचा नाही. त्यांच्या गळ्यामध्ये यंत्र बसवण्यात आले होते. संगणक त्यांचा सोबती होता. ज्याकाही कल्पनांचा ते शोध लावायचे किंवा नवीन संशोधन आणायचे ते संगणकाच्या माध्यातूनच जगभर पोहोचवायचे. ‘डार्क एनर्जी’च्या संकल्पनेवर मतभिन्नता असली तरी त्यांनी त्यांच्या सिद्धांत आणि संशोधनाच्या माध्यमातून विज्ञानाला चालना दिली.

डॉ. जी.एस. खडेकर, विभाग प्रमुख, गणित, नागपूर विद्यापीठ

बुद्धिमत्तेला सलाम!

बोस्टर्न विज्ञान संग्रहालयात त्यांचे दीड तासाचे भाषण ऐकण्याचा योग आला. त्यांचे भाषण ऐकण्यासाठी ५० ते ६० जण ‘व्हिलचेअर’वर आले होते, याचे मला विशेष कौतुक वाटले. स्टिफन एक विचारवंत होते. ‘ब्लॅक होल’ हा माझ्याही अभ्यासाचा विषय होता. त्यांच्या कल्पना अचंबित करणाऱ्या होत्या. एकाच बाबीवर ते विविधांगी विचार करायचे. आश्चर्य वाटायचे की एक माणूस विविधांगी विचार कसा करू शकतो? त्यांचे विद्यार्थी फलकावर काही सिद्धांत मांडत असताना ते त्यात दुरुस्ती करायचे. प्रत्येक पाच-दहा वर्षांत ते एक तरी नवीन विचार घेऊन आले आहेत. त्यांच्या बुद्धीला माझा सलाम!

डॉ. संजय वाघ, अभ्यासक, ‘ब्लॅक होल

सर्वसामान्यांचा शास्त्रज्ञ

विज्ञानाच्या क्षेत्रात स्टिफन हॉकिंगचे मोठे योगदान आहे. शरीर साथ देत नसतानाही त्यांनी अत्युच्च शिखर गाठले. विज्ञान क्षेत्रातील ‘क्वांटम फिजिक्स’ आणि ‘गुरुत्वाकर्षण’ या दोन्ही सिद्धांतामध्ये ते पारंगत होते. त्यांनीच ‘ब्लॅक होल’ हा सिद्धांत मांडला. सर्वसामान्य माणसाला विज्ञान समजेल या भाषेत त्यांनी पुस्तके लिहिली. कठीण संकल्पना सोप्या सोप्या करून विज्ञानाची लोकप्रियता वाढवली. त्यांची पुस्तके वाचल्यानंतर  हे कळते. त्यांचे ‘अ ब्रिफर हिस्ट्री ऑफ सायन्स’ हे जगातील सर्वाधिक खपाचे पुस्तक आहे. ‘द थेअरी ऑफ एव्हरीथिंग’ ही दोन्ही पुस्तके सर्वानी वाचावीत अशी आहेत.

डॉ. त्र्यंबक करडे, माजी विभाग प्रमुख, गणित, नागपूर